पुणे-महाड बसला अपघात, चालकाच्या प्रसंगावधनाने वाचले 76 जणांचे प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,महाड

पुणे महाड गाडीला महाडजवळच्या वाघजाई घाटामध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये चालकाने प्रसंगावधान राखलं नसतं तर बरेच प्रवासी मृत्यूमुखी पडलए असते. चालक मोहन बांदल यांना बसवर वेळीच ताबा मिळवता आल्याने बसमधून प्रवास करणारे सुमारे 76 प्रवासी सुखरुप बचावल्याची प्राथमिक माहिती महाड आगारातून देण्यात आली आहे. बांदल यांनी प्रसंगावधान दाखवले नसते तर बस आंबेनळी घाटाप्रमाणेच खोल दरीत कोसळली असती आणि तसाच अपघात झाला असता.

प्राथमिक माहितीनुसार सकाळी आठ वाजता भोर आगारातून एसटी बस (एमएच 14/ बीटी 3847) चालक मोहन बांदल 76 प्रवाशांना घेऊन महाड दिशेने रवाना झाले होते. दुपारी बाराच्या सुमारास वाघजाई घाटामध्ये बस आली असताना वाघजाई मंदिरापासूनच्या महाड हद्दीतील दुसऱ्या वळणावर आली असता बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे चालक मोहन बांदल यांच्या लक्षात आले. बस धोकादायक वळणाच्या टोकावर आली असताना बांदल यांनी शर्थीचे प्रयत्न करत बसचे ब्रेक दाबले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे बस दरीच्या अगदी काठावर येऊन थांबली. बसमधून सगळेच्या सगळे म्हणजे 76 प्रवासी उतरल्यानंतर त्यांना आपल्यावर काय प्रसंग ओढावला होता याची कल्पना आली. त्यांनी बांदल यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्यांचे कौतुक केले.