Corona Virus – महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेची सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखीच ही स्थिती आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला तसे पत्रच पाठवले आहे. कोरोना स्थितीबाबत आरोग्य अधिकारी गंभीर नाहीत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध आरोग्य यंत्रणा घेत नाही. नाईट कर्फ्यू, वीपेंड लॉकडाऊनसारखे उपायही प्रभावी ठरलेले दिसत नाहीत. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या ऑगस्ट-सप्टेंबरसारखे कडक निर्बंध लागू करण्याची गरज आहे, असा सल्ला या पत्रात देण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना हे पत्र पाठवले आहे. केंद्रीय पथकाने गेल्या 7 मार्च ते 11 मार्च दरम्यान राज्यातील विविध भागांचा दौरा करून तेथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्याचा अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला सादर करण्यात आला. त्या अहवालाच्या आधारेच राज्य सरकारला केंद्राकडून हे पत्र पाठवण्यात आले आहे. केंद्रीय पथकाने पाहणी केलेल्या जिह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक आढळून आले होते.

चाचण्यांचे प्रमाण वाढवा

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधण्याचा पुरेसा प्रयत्न केला जात नाही. लक्षणे नसलेले रुग्ण आणि लक्षणे नुकतीच सुरू झालेले रुग्ण यांचे प्रमाण त्यात जास्त असते. त्यांच्याही चाचण्या केल्या गेल्या पाहिजेत असे सांगतानाच, चाचण्यांचे प्रमाण वाढवा असा सल्ला या अहवालात देण्यात आला आहे. राज्यात आता आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली पाहिजेत असे त्यात म्हटले आहे.

‘सारी’ आणि ‘इली’ रुग्णांचा शोध महत्त्वाचा

कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्याबरोबरच फुप्फुसाचा गंभीर संसर्ग (सारी) आणि फ्लूसारखी लक्षणे असलेले (इली) रुग्ण शोधण्यावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण ‘सारी’ आणि ‘इली’ रुग्णांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता सर्वाधिक असते. अशा रुग्णांना कोविड विषाणूची लागण झाल्यास ते जीवघेणे ठरू शकते.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी रात्रीची संचारबंदी तसेच शनिवार–रविवार लॉकडाऊन करण्यासारखे उपाय केले जात आहेत; परंतु ते तितकेसे प्रभावी ठरलेले नाहीत. शहरी आणि ग्रामीण भागांमधील लोक संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेत नाहीत. तसेच रुग्णांचा शोध, तपासणी आणि विलगीकरणातही आरोग्य अधिकारी पुरेसे लक्ष देत नाहीत असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

ऑगस्ट–सप्टेंबरसारख्या उपायांची गरज

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात कडक उपाययोजना केल्या गेल्या होत्या. कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेणे, रुग्णाचे कुटुंबीय व त्याच्या संपर्कातील अन्य व्यक्तींना क्वारंटाइन करणे, रुग्ण आढळलेल्या इमारतींना कण्टेनमेंट झोन म्हणून घोषित करणे, रुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे आदी उपायांचा त्यात समावेश होता. तशाच प्रकारच्या उपाययोजना आता करण्याची गरज आहे, असे अहवालात आवर्जून नमूद करण्यात आले आहे.

बाधित रुग्णांचे किमान 30 कॉण्टॅक्ट शोधा

केंद्रीय पथकाने केलेल्या पाहणीत मुंबईत कोरोना संसर्गाचे प्रमाण 51 टक्के तर संभाजीनगरमध्ये 30 टक्के असे होते, असे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. रुग्णसंख्येचा चढता आलेख खाली आणण्यासाठी कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान 20-30 व्यक्तींचा शोध आरोग्य यंत्रणांनी घेतला पाहिजे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मुंबईतील सर्व शिक्षकांना आजपासून वर्क फ्रॉम होम

मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उद्या 17 मार्चपासून सर्व शाळांमधील शिक्षकांना घरात राहूनच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याच्या सूचना मुंबई महापालिका आयुक्त तसेच शिक्षण विभाग कार्यालयाने दिल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करायचे असून या काळातील शिक्षकांची उपस्थिती ग्राह्य धरण्यात येईल असेही महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

घरातून काम करणाऱया शिक्षकांनी केलेल्या कामाची नोंद गुगल शीट, फॉर्म, वर्कशीटमध्ये करायची असून या कामाचे पर्यवेक्षीय अधिकाऱयांनी पर्यवेक्षण करायचे आहे. तसेच शालेय पोषण आहारासंबंधी वाटप करण्यासाठी मुख्याध्यापकांनी शाळेत शिक्षकांना बोलवायचे असून जास्त शिक्षकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिल्या आहेत.