कॅनडाची एमआरएनए कोरोना लस हिंदुस्थानात तयार होणार, 60 कोटी डोस उत्पादन करण्याची योजना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅनडाची ‘एमआरएनए-पीटीएक्स’ कोरोना लस आता हिंदुस्थानात तयार होणार आहे. त्यासाठी हैदराबाद येथील बायोलॉजिकल-ई या लस उत्पादक कंपनीने कॅनडाच्या प्रोविडेन्स थेरेप्युटीक्स होल्डिंग कंपनीशी करार केला आहे. त्यानुसार 2022 मध्ये तब्बल 60 कोटी डोसचे उत्पादन करण्याची योजना तयार केली आहे.

देशात सध्या कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक या तीन लसींच्या आपत्कालीन वापरला मंजुरी मिळालेली असतानाही सर्वत्र लसीचा तुटवडा आहे. त्या पार्श्वभूमीवर बायोलॉजिकल-ई या लस उत्पादक कंपनीने कॅनडाच्या ‘एमएनआरए’ या लसीची निर्मिती करणाऱया प्रोविडेन्स थेरेप्युटीक्ससोबत करार केला आहे. त्यानुसार बायोलॉजिकल-ईला लस बनवण्याचे तंत्रज्ञान, लसीचा फॉर्म्युला आणि आवश्यक असलेली सर्व माहिती मिळणार आहे. पुढील वर्षी 600 मिलियन म्हणजे जवळपास 60 कोटी लसीचे डोस तयार केले जाणार आहे.

दरम्यान, सदर लसीचे 30 कोटी डोस लवकरच हिंदुस्थानला देण्याचे प्रोविडेन्सने मान्य केले आहे. त्यामुळे देशातील नागरिकांची कोरोनाविरोधात लढण्याची ताकद वाढणार असल्याचे बायोलॉजिकल-ईच्या व्यवस्थापकीय संचालक महिमा डाल्टा यांनी स्पष्ट केले आहे.

‘बायोलॉजिकल-ई’ला 30 कोटी डोससाठी 1500 कोटी देणार

केंद्रीय आरोग्य मंत्रालय कोरोना लसीच्या 30 कोटी डोससाठी हैदराबादस्थित लस उत्पादक बायोलॉजिकल-ई कंपनीला 1500 कोटी रुपये अॅडव्हान्स देण्यात येणार आहेत. बायोलॉजिकल-ईद्वारा ऑगस्ट-डिसेंबर 2021 पर्यंत ही लस तयार केली जाईल आणि साठवली जाईल. बायोलॉजिक्स-ईद्वारा विकसित केलेली लस एक आरबीडी प्रोटीन सब-युनिट लस आहे. बायोलॉजिकल-ईला लसीच्या प्रिक्लिनिकल स्टेज ते फेज-3 पर्यंत पेंद्र सरकारने मदत केली आहे. ज्यासाठी जैव तंत्रज्ञान विभागाने 100 कोटींपेक्षा जास्त आर्थिक मदत दिली आहे.