Canva Down – ‘कॅनव्हा’नं दगा दिला, कामकाज ठप्प; फोटो, व्हिडीओ डाऊनलोड होईना

canva down

फोटो आणि व्हिडीओ एडिट करण्यासाठी वापरले जाणारे ‘कॅनव्हा’ हे लोकप्रिय ऑनलाईन डिझाईनिंग फ्लॅटफॉर्म आहे. जगभरातील लाखो लोक याचा वापर करतात. मात्र मंगळवार सकाळपासून ‘कॅनव्हा’ डाऊन झाले आहे. गेल्या दोन तासांपासून कॅनव्हावर फोटो, व्हिडीओ आणि इतर प्रोजेक्ट डाऊनलोड करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे अनेक कार्यालयांमधील कामकाज ठप्प झाले असून युजर्स मेटाकुटीला आले आहेत.

मंगळवार सकाळपासून कॅनव्हाचे सर्व्हर डाऊन दाखवत होते. वेबसाईटवर काम करताना केलेले बदल सेव्ह होत नव्हते आणि बदल केलेले डाऊलोडही करता येत नव्हते. युजर्सला सकाळी 8 वाजल्यापासून या समस्येचा सामना करावा लागत आहे. कॅनव्हानेही काहीतरी समस्या झाल्याचे मान्य केले आहे.

कॅनव्हाने आपल्या अधिकृत एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवर एक पोस्ट करत ग्लीच आल्याचे म्हटले आहे. यावर आम्ही काम करत असून सर्वकाही लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कॅनव्हाने म्हटले. तसेच अपडेटसाठी कॅनव्हाची साईट https://canvastatus.com पाहण्यास सांगितले आहे.