केअरटेकर पलकनेच भय्यू महाराजांचा घात केला, सेवेकऱ्यासह तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । इंदूर

केअरटेकर म्हणून ठेवलेल्या पलकनेच भय्यू महाराजांचा घात केल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. आपल्याशी लग्न करा नाहीतर तुमचा दाती महाराज करीन अशी धमकी देत पलकने भय्यू महाराजांना ब्लॅकमेल केले. या कामात तिला सेवादार विनायक दुधाळे आणि शरद देशमुख यांनी मदत केली. भय्यू महाराजांना आत्महत्या करण्यास या तिघांनीच भाग पाडले असा खळबळजनक खुलासा इंदूर पोलिसांनी केला असून या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

इंदूरचे पोलीस महानिरीक्षक हरिनारायणाचारी मिश्रा यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. भय्यू महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचा धागा पकडून पोलीस तपास करत होते, परंतु चालक कैलास पाटील याने महाराजांचे वकील निवेश बडजात्या यांना पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर या घटनेच्या तपासाची दिशाच बदलून गेली असे मिश्रा म्हणाले. पोलिसांनी या प्रकरणात एकूण 125 जणांची चौकशी केली व 28 जणांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळय़ा दिशेने तपास सुरू केला असता अत्यंत धक्कादायक माहिती पुढे आली.

केअरटेकर पलक, सेवादार विनायक व शरद हे तिघे भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करत होते. महाराजांची पहिली पत्नी माधवी यांचे निधन झाल्यानंतर पलक हिला केअरटेकर म्हणून घेण्यात आले होते. पलकने लग्नासाठी त्यांना वेठीस धरले होते तर विनायक व शरद त्यांच्याकडून पैसे उकळत होते. त्यातच महाराजांची प्रकृती बिघडली. हे तिघे महाराजांना देत असलेल्या औषधांमुळे त्यांचे मानसिक संतुलनही बिघडले होते, असा दावाही मिश्रा यांनी केला.