मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या वडिलांची आत्महत्या, पत्नीविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जतमधील एका रिक्षाचालकाने आत्महत्या केली आहे. जवळपास आठवडाभरापूर्वी सुरेश (बदललेले नाव) याच्यावर त्याच्या मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. सुरेशने भरधाव ट्रेनपुढे स्वत:ला झोकून देत आपले आयुष्य संपविले. सुरेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्याची पत्नी मीना (बदललेले नाव) मीनाची आई, भाऊ आणि मेहुणी यांच्याविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सुरेशने 26 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. तआत्महत्येच्या एक दिवस आधी म्हणजेच 25 ऑक्टोबरला सुरेशविरोधात बलात्काराची तक्रार करण्यात आली होती. आपल्या मुलीवर बलात्कार केल्याचा सुरेशवर आरोप करण्यात आला होता आणि त्याच्याविरोधात मीनाने तक्रार दिली होती.

कर्जत जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी सांगितले की, 26 ऑक्टोबर रोजी सुरेशच्या आत्महत्येनंतर त्यांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल केल्यानंतर सुरेशच्या आईकडून त्यांना कळाले होते की सुरेशविरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादव यांनी सांगितले की सुरेशने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या भावाला एक व्हिडीओ पाठवला होता. यामध्ये त्याने म्हटले होते की, पत्नीला घटस्फोटास नकार दिल्याने त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

गेल्या वर्षी मीना तिचा भाऊ आणि भावाच्या बायकोसह दुबईला कामानिमित्त गेले होते. सुरेश आणि मीना यांना दोन मुले आहेत. त्यांना मोठी मुलगी आणि लहान मुलगा अशी दोन मुले असून बायकोच्या अनुपस्थितीत सुरेशच या दोघांची काळजी घेत होता. मुलगी 10 वर्षांची असून मुलगा हा 5 वर्षांचा आहे. काही दिवसांपूर्वी सुरेशची मुलगी मीनाच्या आईवडिलांकडे गेली होती. यावेळी तिने आजीआजोबांना सांगितले की सुरेशने तिच्यावर बलात्कार केला आहे. हे कळताच मीना 25 ऑक्टोबरला हिंदुस्थानात परत आली. मीनाने सुरेशला जाब विचारण्यासाठी घर गाठले तेव्हा सुरेश घरी नव्हता. मीनाने पोलीस स्टेशन गाठून सुरेशविरोधात तक्रार नोंदवली. याच्या दुसऱ्याच दिवशी सुरेशने आत्महत्या केली. सुरेशने त्याच्या भावाला पाठवलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की त्याच्या मुलीला कोणीतरी पढवून आरोप करायला लावले आहेत. सदर प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी सांगितले.