
हिंदुस्थानची अस्मिता दुखावणे आणि देशातील कायद्यांना न जुमानणे ट्विटरला चांगलेच महागात पडले आहे. हिंदुस्थानचा चुकीचा नकाशा पोस्ट केल्याप्रकरणी ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरुद्ध याआधीही विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. तसेच उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना सर्वोच्च न्यायालयातही खेचले आहे. त्यामुळे ट्विटरची कायद्याच्या कचाटय़ातून लवकर सुटका होण्याची शक्यता कमी आहे.
ट्विटरने आपल्या वेबसाइटवर हिंदुस्थानच्या नकाशात फेरफार केल्याचे सोमवारी निदर्शनास आले. देशाच्या नकाशातून जम्मू-कश्मीर आणि लडाख हे दोन पेंद्रशासित प्रदेश वगळून चुकीचा नकाशा पोस्ट करण्यात आला. याप्रकरणी बजरंग दलाचे नेते प्रवीण भाटी यांनी तक्रार केल्यानंतर उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये मनीष माहेश्वरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. महिनाभरात त्यांच्याविरुद्ध दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. याआधीच्या गुह्यात गेल्या आठवडय़ात कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशामुळे माहेश्वरींची अटक तूर्त टळली आहे. मात्र त्या आदेशाला उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
मध्य प्रदेश सरकारचा कारवाईचा आदेश
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही माहेश्वरी यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. माहेश्वरी यांनी देशविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप आहे. तसेच मुस्लिम वृद्ध महिलेला मारझोड केल्या प्रकरणात माहेश्वरी यांना 17 जूनला गाझियाबाद पोलिसांनी समन्स बजावले होते. मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माहेश्वरींसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.




























































