कॅस्पर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विक्रम गायकवाड

तरस. माणसंही याच्यापासून लांब राहतात आणि त्यालाही माणसांशी काही देणंघेणं नसतं. पण डॉ. प्रकाश आमटेंचे कॅस्परबरोबरचे नाते काही वेगळेच आहे.

तरस’ हा प्राणी आपल्याला माहीत असेलच. त्याला इंग्रजीमध्ये ‘हाईना’ म्हणतात. हा प्राणी मोठय़ा टोळ्यांनी फिरतो. वाघ-सिंह यांनी केलेल्या आयत्या शिकारीवर त्याचा डोळा असतो. तसं बघितलं तर तीन-चार तरसांना वाघ-सिंह अगदीच आरामात लोळवू शकतात. पण त्यांची संख्या इतकी जास्त असते की, बऱयाचदा जंगलाच्या राजांना सुद्धा आपली शिकार सोडून पळून जावं लागतं. साधारणपणे कुत्र्यासारखा चेहरा, शरीराचा पुढचा भाग उंच आणि मागचा भाग निमुळता होत गेलेला, विचित्र रंगसंगती यामुळे तरस हा प्राणी तसा फार कोणाच्या आवडीचा नसतो. त्यात गँग घेऊन फिरणाऱ्यांची आपल्याला भीती वाटतेच. त्यामुळे कधी कोणी म्हणताना मी तरी ऐकलं नाहीये की ‘अगंबाई किती गोड तरस आहे’ किंवा ‘माझा सर्वात आवडता वन्य प्राणी तरस आहे’. म्हणूनच आपल्या चित्रपटांमध्ये, कार्टून्समध्ये सुद्धा तरसाला नकारार्थी भूमिकाच मिळाल्या आहेत. उदाहरणार्थ – द लायन किंग.

माझंही तरसावर फार विशेष प्रेम नव्हतंच जोपर्यंत मी ‘लोक बिरादरी प्रकल्पा’तल्या ‘कॅस्पर’ला बघितलं नव्हतं. इतका राजबिंडा तरस मी आजपर्यंत तरी कधीच पाहिला नव्हता. उंच, सुंदर शरीरयष्टी, छान वाढलेले केस आणि मुख्य म्हणजे त्याच्या डोळ्यात हरवलेपणा नव्हता. प्रकाश आमटे रोज त्याच्या पिंजऱ्यात त्याला भेटायला जात. त्याचे लाड करत. त्याच्या अंगावरून हात फिरवत आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते त्याच्या तोंडात हात घालत. त्याच्या खरखरीत जिभेवरून हात फिरवत. तरीही त्याने कधीही काहीही केलं नाही. खरंतर वन्य मांसाहारी प्राण्यांमध्ये सगळ्यात मजबूत जबडा हा तरसांचा असतो. तरस आपलं पोट भरण्यासाठी शिकार करतात. वाघ-सिंहांची शिकार चोरतात आणि यातलं काही मिळालं नाही तर प्रसंगी मेलेले प्राणीही खातात. तरस त्यांच्या जबड्याने हाडपण फोडून खाऊ शकतात. पण ‘कॅस्पर’ प्रकाश आमटेंचा हात आपल्या मजबूत जबड्यात अलगद पकडतो. याचं कारण फक्त आणि फक्त एकमेकांवरचा विश्वासच आहे. लोक बिरादरी प्रकल्पातले सगळेच प्राणी, म्हणजे चार पायांचे आणि दोन पायांचे, एकमेकांशी इतके समरूप झाले आहेत की कोणीच कोणाला इजा करायचा साधा विचारसुद्धा करत नाहीत.

मी ज्या ‘विलास मनोहर’ यांची भूमिका केली त्यांचासुद्धा हे प्राण्यांचे नंदनवन फुलवण्यात मोठा हातभार आहे. त्यांनी लिहिलेलं ‘नेगल-1’ आणि ‘नेगल-2’ ही पुस्तकं वाचली तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल. त्या आणि तशा अनेक पुस्तकांमध्ये अनेक चांगले- वाईट असे त्यांचे सगळेच अनुभव, किस्से, घटना आहेत. त्या इथे सांगायचा मला खूप मोह होतोय, पण मी तसं करणार नाही. त्यासाठी तुम्ही ती पुस्तकं विकत घेऊनच वाचा. कारण विलास मनोहर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून येणारे पैसे ‘लोक बिरादरी प्रकल्प’ आणि ‘आमटेज् ऍनमल आर्क’ला देतात. स्वतःकडे एकही रुपया न ठेवता. त्यामुळे आपण प्रत्यक्ष त्यांना मदत करू शकत नसलो, तरी त्यांची पुस्तकं वाचून खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो.

अजून एक छोटीशी गोष्ट आठवली. एकदा आम्ही असंच काहीतरी बोलत होतो आणि आमटेंना भिंतीवर एक पाल दिसली. त्यांनी बोलणं न थांबवता अलगद ती पाल उचलली आणि एका कार्यकर्त्याला हात केला. तो जवळ आल्यावर ती पाल त्याच्या हातात दिली आणि सांगितलं, ‘त्या तीन नंबरमधल्या सापाला भूक लागली असेल. त्याला नेऊन दे.’ तोही तितक्याच निर्विकारपणे ती पाल घेऊन गेला. आपल्याकडे पाल नुसतीच दिसल्यावर होणारा आरडाओरडा तुम्ही सगळ्यांनीच अनुभवला असेलच. तिकडे मात्र निसर्गात खूप मोठमोठय़ा गोष्टी घडतानासुद्धा एक शांतता असते. तीच शांतता मेन्टेन करणं त्यांना जमून गेलंय आणि आता ते त्यांच्या अंगवळणीसुद्धा पडलंय.

[email protected]