CBI ची 19 राज्यांत 110 ठिकाणी छापेमारी, मुंबई-ठाण्यात दिवसभर सर्च ऑपरेशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

देशातून भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून टाकण्याच्या दिशेने पावले टाकत सीबीआयने मंगळवारी एकाच दिवशी 19 राज्यांमध्ये तब्बल 110 ठिकाणी छापेमारी केली. मुंबई, ठाणे आणि पुण्यातही छापे टाकण्यात आले. भ्रष्टाचार आणि शस्त्र तस्करी प्रकरणात तपास यंत्रणेने जवळपास 30 वेगवेगळे गुन्हे दाखल केले. या धडक कारवाईने देशभरातील घोटाळेखोरांची झोप उडाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार निवडणुकीदरम्यान बोलून दाखवला. त्यालाच अनुसरून सीबीआयने कारवाई सुरू केली आहे.
2 जुलैला 12 राज्यांतील 18 शहरांमध्ये 50 ठिकाणी छापे टाकण्यात आले त्यावेळी 14 गुन्हे दाखल केले होते. त्या कारवाईला आठवडा उलटत नाही तोच पुन्हा धाडी टाकण्यात आल्याने घोटाळेखोरांना पळता भुई थोडी झाली आहे. मंगळवारी सीबीआयच्या 12 पथकांनी मुंबई, ठाणे, पुण्यासह दिल्ली, चंदिगड, जम्मू, श्रीनगर, जयपूर, गोवा, रायपूर, हैदराबाद, मदुराई, कोलकाता, रौरकेला, रांची, बोकारो, लखनौ, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि बिहार आदी 110 ठिकाणी छापे टाकले.

घोटाळ्यातील रक्कम 1100 कोटींच्या घरात

सीबीआयने गुन्हे दाखल केलेल्या 16 प्रकरणांतील घोटाळ्याची रक्कम 1100 कोटींच्या घरात गेली आहे. तपासादरम्यान या रकमेत आणखीन वाढ होऊ शकते, अशी शक्यता सीबीआय अधिकाऱ्यांनी वर्तवली.

आतापर्यंत 2 लाख कोटींची वसुली

2018-19 या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये झालेल्या फसवणुकीच्या गुह्यांची संख्या 739 इतकी होती. बँकांनी मागील पाच वर्षांत कायदेशीर कारवाईच्या माध्यमातून 2 लाख 6 हजार 586 कोटींची वसुली केली आहे.