
एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला शोभेल अशी थरारक घटना आज सायंकाळी माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या वरळीतील निवासस्थानाखाली घडली. साध्या वेषातील दहा जणांच्या टोळीने देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना अक्षरशः गाडीत घालून बीकेसीच्या दिशेने पळवून नेले. एक तास हा थरार सुरू होता. चतुर्वेदी यांना बीकेसीत नेल्यानंतर संबंधित व्यक्तींनी वीसच मिनिटांत त्यांची सुटका केली. नंतर समजले की ते सीबीआयचे अधिकारी होते.
चतुर्वेदी आणि डागा यांना घेऊन ती इनोव्हा गाडी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (बीकेसी) घुसली. बीकेसीमध्ये सीबीआयचे कार्यालय आहे. त्यामुळे चतुर्वेदी यांना सीबीआयने उचलले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला. तो खराही होता. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच देशमुख कुटुंबियांनी वरळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अज्ञात इसमांनी चतुर्वेदी आणि डागा यांचे अपहरण केल्याचा आरोप करत त्यांनी तक्रार नोंदवली. कारण तोपर्यंत त्यांना ते सीबीआयचे अधिकारी होते याची कल्पनाही नव्हती.
पूर्वसूचना न देताच उचलले
अनिल देशमुख यांच्या सूनबाई राहत देशमुख यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘‘आमचे जावई गौरव चतुर्वेदी यांचे दहा जणांनी अपहरण केले. ते कोण होते आम्हाला काहीच माहीत नाही. आम्हाला कोणतेही पत्र किंवा फोन कॉल तत्पूर्वी आला नाही.’’ सीबीआय असो वा ईडी, या दोन्ही संस्थांना कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना तशी पूर्वसूचना देण्याची प्रक्रिया पार पाडावी लागते. मात्र तशी कोणतीही पूर्वसूचना न देता अशी कारवाई करणे म्हणजे नियमाचा भंग असल्याचे देशमुख कुटुंबियांचे म्हणणे आहे.
वकील डागा यांचा रात्री उशिरापर्यंत जबाब
गौरव यांना सीबीआयने वीस मिनिटांत सोडले. त्यांचे वकील आनंद डागा रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचले नव्हते. सीबीआयने त्यांच्या कुटुंबियांनाही त्यासंदर्भात काहीच कळवले नव्हते. अनिल देशमुखांच्या ‘क्लीन चिट’ची बातमी डागा यांच्याकडूनच प्रसारमाध्यमांना दिली गेल्याचा सीबीआयला संशय असावा अशी चर्चा सुरू आहे. डागा यांचा जबाब नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते.
असा घडला थरार
अनिल देशमुख यांचे निवासस्थान असलेल्या वरळी येथील सुखदा इमारतीखाली सायंकाळी 6च्या सुमारास हा प्रकार घडला.
देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि त्यांचे वकील आनंद डागा या दोघांना दहा जणांनी घेरले. काही विचारण्यापूर्वीच त्यांचे मोबाईल काढून घेतले.
दोघांना काहीच हालचाल करू न देता पकडून एका 1500 क्रमांकाच्या पांढऱया रंगाच्या इनोव्हा गाडीत
जबरदस्तीने बसवून पळवण्यात आले.
गौरव यांना का किडनॅप केले?
गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने बीकेसीतील आपल्या कार्यालयात नेले. त्यानंतर वीस मिनिटांत सोडून दिले.
वीस मिनिटांत त्यांनी काय केले?
चतुर्वेदी यांची चौकशी केली का? कोणत्या संदर्भात केली? याबद्दल शंकाकुशंका व्यक्त होऊ लागल्या आहेत.
अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीन चिट दिल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते. ती बातमी कोणी फोडली याचा शोध सीबीआयकडून घेतला जात आहे. कदाचित त्याचसंदर्भात चतुर्वेदी आणि डागा यांना संशयावरून सीबीआयने उचलले असावे, असेही म्हटले जात आहे.





























































