
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी, बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. देशाचा दहावीचा निकाल 93.12 टक्के तर बारावीचा निकाल 87.33 टक्के इतका लागला आहे. महाराष्ट्रानेदेखील यंदाच्या परीक्षेत चांगली कामगिरी केली असून राज्याचा दहावीचा निकाल 96.97 टक्के तर बारावीचा निकाल 87.11 टक्के इतका लागला आहे. बोर्डाने यंदाही मेरिट लिस्ट जाहीर केलेली नाही तसेच प्रथम तीन क्रमांकांवरील विद्यार्थ्यांना बोर्डाकडून पारितोषिकेही देण्यात येणार नाहीत. मात्र विषयनिहाय सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे.
बारावीच्या परीक्षेला देशभरातील 16 हजार 728 शाळांमधील 16 लाख 80 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 16 लाख 60 हजार 511 विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यामधील 14 लाख 50 हजार 174 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 6.01 टक्क्यांनी अधिक आहे. मुलींचा निकाल 90.68 टक्के असून मुलांचा निकाल 84.67 टक्के एवढा लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दहावी, बारावीचा निकाल घटला असून दहावीचा निकाल 1.28 तर बारावीचा निकाल 5.38 टक्क्यांनी घसरला आहे, तर 21 लाख 84 हजार 117 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 21 लाख 65 हजार 805 विद्यार्थी परीक्षेला बसले. यातील 20 लाख 16 हजार 779 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीतही मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असून 94.25 टक्के मुली तर 92.27 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा निकाल 90 टक्के आहे.
त्रिवेंद्रम विभागाचा सर्वाधिक निकाल
देशभरात दहावी, बारावीच्या परीक्षेत त्रिवेंद्रम विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. दहावीचा निकाल 99.91 टक्के तर बारावीचा निकालही 99.91 टक्के इतका लागला आहे. दहावीचा निकाल मुंबईचा समावेश असलेला पुणे विभाग पाचव्या स्थानावर आहे. पुणे विभागाचा निकाल 96.92 टक्के लागला आहे, तर पुणे विभागाचा बारावीचा निकाल 87.28 टक्के इतका लागला असून देशभरात पुणे विभाग आठव्या स्थानावर आहे.
3 कोटी 12 लाख रुपये सॅनिटायझर्स, मास्क, पिण्याच्या पाण्यावर खर्च
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने परीक्षा पेंद्रावर चोख खबरदारी घेतली होती, पण त्यासाठी बोर्डाला कोटय़वधी रुपये मोजावे लागले. दहावी, बारावी परीक्षेदरम्यान 1.95 कोटी रुपये हॅण्ड सॅनिटायझर्स, साबण, मास्क, कचरापेटी खरेदी करण्यासाठी, तर 1.17 कोटी रुपये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी खर्च करण्यात आल्याचे सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले. त्यासाठी अनुक्रमे रुपये पाच आणि रुपये तीन प्रतिविद्यार्थी घेण्यात आले आहेत.
> दहावीच्या 1,95,799 विद्यार्थ्यांना 90 टक्के आणि अधिक, तर 44 हजार 297 विद्यार्थ्यांना 95 टक्के आणि जास्त गुण.
> बारावीच्या 1,12,838 विद्यार्थ्यांना 90 टक्के आणि अधिक, तर 22 हजार 622 विद्यार्थ्यांना 95 टक्के आणि जास्त गुण.
महाराष्ट्रातील उत्तीर्ण विद्यार्थी
दहावी : एकूण 97,296
उत्तीर्ण 94,089
बारावी : एकूण 32,507
उत्तीर्ण 28,317

























































