
गेवराई शहरामध्ये चौकाचौकात 36 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्यामुळे गेवराई शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले तसेच कॅमेऱ्यामुळे अनेक मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत. शहरातले चोरीच्या घटनाही कमी झाल्या आहेत. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना या कॅमेऱ्यांचा फायदा होत आहे. या कॅमेऱ्यांवर आणि फूटेजवर देखरेख ठेवण्यासाठी तीन पोलीस कर्मचारी तैनात आहेत.
गेवराई शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मारामारी, छेडछाड, चोरी, व्यापाऱ्यांना धमकावणे यामुळे गेवराईचे नाव गुन्हेगारीत अव्वल क्रमांकावर होते. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून शहरांमध्ये 36 सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले आहेत. त्यामुळे शहर पोलिसांच्या देखरेखीखाली आल्यामुळे गेवराई शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे. कॅमेऱ्यामुळे शहरातील टू व्हीलर व फोर व्हीलर चोरटे पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
शाळा आणि कॉलेज बस स्टॅन्ड परिसरातील मुलींचे छेडछाडीचे प्रमाण कमी झाले असून बस स्टँड येथील अनेक पाकीटमारांवर कारवाई करण्यात आली आहे. नियम मोडून वाहन चालविल्यास अनेक वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे. अनेक मोठ्या गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात या कॅमेऱ्याचा मोठा फायदा झाला आहे. गेवराई शहरातील खटका मार्केट येथील शर्मा खून प्रकरणातील गुन्हेगार पकडण्यात या कॅमेऱ्यामुळे पोलीस प्रशासनाला यश आले होते.
शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात या 36 कॅमेऱ्यांमुळे फायदा झाला असून कॅमेऱ्यांवर आणि तेथून येणाऱ्य़ा फूटेजवर लक्ष ठेवण्यासाठी तीन पोलीस कर्मचारी तैनात आहेत. संशयास्पद एखादी घटना वाटल्यास त्या ठिकाणी तात्काळ पोहोचून संभाव्या धोका रोखण्यास पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे याचा गेवराई शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठा फायदा होत आहे.
































































