केंद्र सरकारकडून करतारपूर कॉरिडॉरच्या निर्मितीची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गुरू नानक जयंतीच्या एक दिवसापूर्वी केंद्र सरकारने शीख धर्मियांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. करतारपूर साहिब कॉरिडरच्या निर्मितीची घोषणा केंद्र सरकारने केली असून यामुळे शीख धर्मियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. हा कॉरिडॉर पंजाब मधील गुरूदासपूरमधून सुरू होऊन पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत असेल. यासाठी केंद्र सरकार निधी देणार असून या कॉरिडरमध्ये अत्याधूनिक सेवांचा समावेश असणार आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा आहे.

हिंदुस्थान सरकार गुरूनानक देव यांची ५५०वी जयंती जागतिक स्तरावर मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल अशी घोषणाही राजनाथ सिंह यांनी केली. गुरुद्वारा साहिब करतार पाकिस्तानमध्ये असून शीख धर्मियांमध्ये या ठिकाणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदुस्थानी शीख धर्मीय दुर्बिणीतून त्याचे दर्शन घेतात.

या कॉरिडरची निर्मिती झाल्यास या पवित्र ठिकाणी जाण्यास शीख धर्मियांना सुलभ होईल. या कॉरिडॉरसाठी हिंदुस्थान पाकिस्तान सरकारशी चर्चा करणार असून पाकिस्तानच्या हद्दीतही अशा कॉरिडॉरच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील.