‘पे ऍण्ड पार्क’मुळे मध्य रेल्वे मालामाल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई महानगरपालिकेने ‘नो पार्किंग’ झोनमध्ये वाहने पार्क केल्यास दहा हजारांपर्यंत दंड ठोठावण्याचे फर्मान काढले असताना मध्य रेल्वेने आपल्या हद्दीतील ‘पे ऍण्ड पार्क’ योजनेत 2018 मध्ये वार्षिक 4.36 कोटींची कमाई केली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या हद्दीत 47 ठिकाणी ‘पे ऍण्ड पार्क’चे तळ असून येत्या काही दिवसांत आणखी 13 नव्या वाहनतळांची भर पडणार आहे.

मध्य रेल्वे स्थानकाजवळील जागेत वाहनतळ उभारल्यामुळे स्थानकापासून दूर राहणाऱ्या प्रवाशांच्या दुचाकींना पार्क करण्याची समस्या दूर झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे वाहनही सुरक्षित राहत असल्याने वाढत्या प्रवासी संख्येमुळे अशा वाहनतळांची मागणी वाढतच चालली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनमध्ये 2018पर्यंत एकूण 36 पार्किंग साइट होत्या. 2019 मध्ये मध्य रेल्वेचे अनधिकृतपणे होणारे पार्किंग रोखण्यासाठी कारवाईकरिता वाहनतळांसाठी नव्या जागा हेरल्या. त्यामुळे नव्या वाहनतळांची भर पडून 11 अतिरिक्त जागा मिळाल्याने एकूण अधिकृत वाहनतळांची संख्या 47 इतकी झाली आहे.

अनेक वाहनतळांवर अनधिकृतपणे समाजकंटकांनी ताबा घेतल्याचेही उघड झाले होते. कल्याणमध्ये मोठय़ा प्रमाणावर अनधिकृतपणे पार्किंग होत होते. या ठिकाणी टेंडर काढण्यात येऊन अधिकृतपणे वाहनतळ स्थापन करण्यात आला आहे. ठाणे येथे 1700 चौरसमीटर जागेत वाहनतळ तयार करण्यात आला आहे. आता वांगणी, अंबरनाथ, कल्याण, उमरमाळी येथे नवीन ‘पे ऍण्ड पार्क’ वाहनतळ उभारण्याचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. त्यामुळे रेल्वेच्या महसुलातही वाढ होणार आहे. या वाहनतळांवर दररोज 25 हजार वाहनांचे पार्किंग होत असल्याने या वाहनतळांचे प्रवाशांच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात येत आहे.

रेल्वेस्थानकांच्या अ, ब, क, ड आणि ई अशा वर्गवारीत तेथील वाहनांच्या पार्किंगचे दर आखण्यात आले आहेत. तसेच स्थानिक पालिकांच्या हद्दीतील पार्किंगच्या दरानुसार हे दर ठरविण्यात आले असल्याचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रॉबिन कालिया यांनी सांगितले.

नव्याने टेंडर काढलेले वाहनतळ

सीएसएमटी फलाट क्र. 18, एलटीटी जुनी इमारत, वांगणी, अंबरनाथ, कल्याण 1, कल्याण 2, कल्याण 3, भांडुप, डोंबिवली, इगतपुरी, वासिंद, निळजे, ठाणे (पश्चिम) अशा ठिकाणी नवे ‘पे ऍण्ड पार्क’ वाहनतळ उभारण्यात आले आहेत.