लोकलच्या चाकातून आला धूर,घाबरलेल्या महिलेने माटुंगा स्थानकात मारली उडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
railway-tracks-mumbai-local

मध्य रेल्वेच्या एका लोकलमध्ये ब्रेक जाम झाल्याने आलेला धूर पाहून घाबरून एका महिलेने लोकलमधून उडी मारल्याने ती जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी माटुंगा रेल्वे स्थानकात घडली. ही 21 वर्षीय महिला सुदैवाने फलाटावरच पडल्याने तिच्या हनुवटीला टाके पडले आहेत.

सीएसएमटी ते कल्याण धावणाऱया लोकलच्या चाकांमधून ब्रेक जाम झाल्याने घर्षणानंतर धूर आल्याने घाबरून एका महिलेने लोकलमधून उडी मारल्याने ती जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव अनिषा खेमाने (21) असे असून तिला घाटकोपरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या हनुवटीला जखम झाल्याने तिच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली असून हनुवटीला सात टाके पडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनिषा या घाटकोपर येथे राहणाऱया असून येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्या हनुवटीला टाके घालण्यात येऊन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.