पालिकेच्या विद्यार्थ्यांना नाश्ताही मिळणार; आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘सेंट्रलाइज्ड कम्युनिटी किचन’ उपक्रमाचे लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱया गोरगरीब कुंटुंबातील विद्यार्थ्यांना आता पौष्टिक नाश्त्याचे वाटपही केले जाणार आहे. ‘अक्षय चैतन्य’ संस्थेच्या माध्यमातून भायखळा येथे सुरू करण्यात आलेल्या ‘सेंट्रलाइज्ड कम्युनिटी किचन’ या उपक्रमाचे लोकार्पण पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रमुख्य उपस्थिती होती.

पालिकेकडून विद्यार्थ्यांना मध्यान्य भोजन दिले जाते. मात्र आता ‘अक्षय चैतन्य’ संस्थेच्या माध्यमातून भूकमुक्त मुंबई मोहिमेंतर्गत राबवण्यात येणारया ‘बाल सुरक्षा आहार’ या नवीन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासवर आणखी लक्ष केंद्रित होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. या ‘कम्युनिटी किचन’मध्ये दररोज तब्बल 25 हजार गरजू लोकांसाठी मोफत जेवण बनवले जाणार आहे. भविष्यात सुरू होणाऱया शाळांमध्येही ‘अक्षय चैतन्य’च्या सहकार्याने पौष्टिक जेवण उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी आमदार यामिनी जाधव, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी,  ‘अक्षय चैतन्य’चे चेअरमन अमितासन दासा, उपक्रमातील विपीन जैन, निखिल चोप्रा, व्ही. आर. के. गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. ‘हरे कृष्ण मूव्हमेंट चॅरिटेबल फाऊंडेशन’चा उपक्रम असलेल्या ‘अक्षय चैतन्य’ने मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांच्यासोबत समन्वय साधून भूकमुक्तीसाठी अन्नदानाचा हा उपक्रम राबवला जाणार आहे.