अंधेरीच्या चकाला परिसरात सोसायटीवर दरड कोसळली, पाच ते सहा घरांचे नुकसान

मुंबईतील अंधेरी पूर्व येथील चकाला परिसरात रामबाग सोसायटी मध्ये दरड कोसळली आहे. मध्यरात्री 2 च्या सुमारास रामबाग सोसायटी च्या बाजूला असलेला डोंगरामधून सोसायटीचा पहिला मजल्यावर चार ते पाच फ्लॅटमध्ये डोंगराचा ढिगारा कोसळला. मध्यरात्री दोनच्या सुमारास घरांमध्ये सर्व नागरिक झोपेत असताना ही दुर्घटना घडली आहे. सुदैवाने या दरड दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र पाच ते सहा घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

सध्या या डोंगरामधून इमारतीवर सतत माती कोसळत असल्यामुळे इमारतीच्या 165 घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि मुंबई पोलिसांचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या ठिकाणी दरड बाजूला सारण्याचे काम सुरु असून स्थानिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.