
शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या दापूरमाळ या आदिवासी गावासाठी आता पक्का रस्ता मिळणार आहे. स्वातंत्र्यापासून दापूरमाळवासीय रस्त्याची वाट पाहात होते. मात्र अनेक अडचणींमुळे रस्त्याचे काम होत नव्हते. आता मुंबईमधील चंद्रा फाऊंडेशन ही संस्था दापूरमाळवासीयांच्या मदतीला आली आहे. ‘चंद्रा’च्या साथीने दापूरमाळ ते माळगावदरम्यान पाच किलोमीटरचा पक्का रस्ता तयार करण्यात येणार असून या भागात विकासाची गंगा वाहणार आहे.
अतिदुर्गम भागात असलेल्या दापूरमाळ गावात जाण्यासाठी रस्ता नाही, विद्यार्थ्यांसाठी गावात शिक्षणाची सोय नाही, पाणीटंचाई पाचवीला पुजलेली आहे. या समस्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न करण्यात आले. परंतु दापूरमाळवासीयांच्या समस्या सुटल्या नाहीत. गावासाठी अनेक विकासकामे मंजूर झाली. मात्र निधी उपलब्ध नसल्यामुळे ती अडकून पडली. याच आणीबाणीच्या प्रसंगात मुंबईतील चंद्रा फाऊंडेशन ही संस्था दापूरमाळवासीयांच्या मदतीला धावून आली आहे. या संस्थेने रस्त्याचे काम हाती घेतले आहे.
चंद्रा फाऊंडेशनच्या माध्यमातून दापूरमाळ ते माळगावदरम्यान पाच किलोमीटर लांबीचा रस्ता होणार आहे. या कामाचे भूमिपूजन रविवारी शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी चंद्रा संस्थेचे अध्यक्ष हसमुख जैन, दापूरमाळमधील शिक्षक संतोष बेंद्रे आदी उपस्थित होते.
भूमिपूजन झाल्यानंतर रस्त्याचे काम लगेच सुरू करण्यात येणार आहे. हे काम येत्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार असून लगेच रस्त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी चंद्रा फाऊंडेशनचे हसमुख जैन यांनी व्यक्त केली.
दुर्गम भाग मुख्य प्रवाहात येणार
शासनस्तरावर दापूरमाळसह पाड्यांसाठी रस्ते, वीज, शिक्षण या सुविधा पुरवण्यासाठी उपाययोजना करण्याचे काम सुरू असून पाणीटंचाई येत्या काही दिवसांत पूर्णपणे संपणार आहे. रस्त्याचे काम करण्यासाठी चंद्रा फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. अशा विविध योजना राबवून या भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.





























































