विमा लाखाचा, मिळाले तीस रुपये; संतप्त शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयात दिली धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाखाच्या विम्याला अवघा तुटपुंजा परतावा मिळाल्याने शेतकऱ्यांनी थेट कृषी कार्यालयात धडक दिल्याची घटना चंद्रपुरात घडली आहे. शेतीचा लाखोंचा विमा शेतकऱ्यांनी काढला होता. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती भुईसपाट झाली. विम्याची रक्कम हातात येईल ही आशा शेतकऱ्यांना होती. मात्र आलेली रक्कम बळीराजाची थट्टा करणारी ठरली. कुणाला वीस रुपये तर कुणाला तीस रुपये विमा मिळाला. या प्रकाराने शेतकरी संतप्त झाले.

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीचा विमा काढला होता. विम्यासाठी शेतकऱ्यांनी हजारच्या वर रक्कम भरली होती. मिळालेली रक्कम अगदीच तुटपुंजी ठरली. या प्रकाराने संतापलेल्या शेतकऱ्यांनी थेट जिल्हा कृषी अधीक्षकाचं कार्यालय गाठलं. कार्यालयात गोंधळ घातला. जिल्हा कृषी अधीक्षकाने विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावलं. मात्र अधिकारी मूग गिळून गप्प बसले. विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली, असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. या विमा कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली होती.