दारूसाठी नातवाने आजीचा कानच तोडला; नातवाला दोन वर्षांची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दारूची तलफ आली अन् दारू मिळाली नाही तर तळीराम कुठल्या थराला जाऊ शकतो याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात आला. दारू प्यायला पैसे नसल्याने नातवाने आजीकडे पैशाचा तगादा लावला. आजीने पैसे देण्यास नकार दिला. आजीच्या कानात असलेल्या सोन्याच्या दागिन्याकडे नातवाचं लक्ष गेलं. तो काढण्यासाठी नातवाने आजीचा कानच तोडला.

ही घटना वर्षभरापूर्वी गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या अळेगावात घडली. या प्रकरणी गोंडपिपरी न्यायालयाने नुकताच निकाल दिला. न्यायालयान नातवला दोन वर्षाची शिक्षा आणि पाच हजाराचा दंड ठोठावला आहे. राहुल देठे असं नातवाचं नाव आहे. राहूल देठे (वय 35) हा गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथील रहिवासी आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. आधीच दारू पिऊन असताना पुन्हा त्याला दारू पिण्याची तलफ आली. पण खिशात पैसे नव्हते. त्यामुळे तो त्याच आजी बुधाबाई रायपुरे (वय 80) यांच्या घरी गेला आणि त्याने दारूसाठी पैशांची मागणी केली. पण पैसे देण्यास आजीने नकार दिला. यामुळे संतापलेल्या राहूलने जबरजस्तीने आजीच्या कानातील सोन्याची बिरी (एक प्रकारचा दागिना) काढली व पळ काढला. या घटनेत आजीचा कानच तुटला व गंभीर जखमा झाल्या.

मागील वर्षी हा प्रकार घडला होता. आजीने या प्रकाराची तक्रार गोंडपिपरी पोलीसात दाखल केली. पोलिसांनी कलम 327 अन्वये राहुलवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी गोंडपिपरीच्या न्यायालयाने नुकताच निकाल दिला. आरोपी राहूलला दोन वर्षांची शिक्षा व पाच हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सरकारी वकील म्हणून अॅड. राजेश धात्रक यांनी कामकाज सांभाळले.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. मात्र दारूबंदीतही कोण पिंपरी तालुक्यात दारूचा महापूर सुरूच होता. मोठी किंमत अदा करून तळीराम आपली तहान भागवीत होते. आता दारू सुरू झाली आहे. अल्प दरात दारू मिळत आहे. मात्र दारूबंदी उठल्यानंतरही असे प्रकार घडत असल्यान चिंता व्यक्त केली जात आहे. गोंडपिपरी तालुक्यात व्यसनमुक्ती संघटनाच काम जोरात सुरू असलं तरी, दारूच्या व्यसनाच्या आहारी अनेक तरुण गेल्याचं धक्कादायक चित्र आहे. दारू, गांजा यांचं व्यसन लागलेल्या तरुणांची संख्या मोठी आहे. अशात न्यायालयाने दिलेली ही शिक्षा तळीरामांना विचार करण्यासाठी लागणारी ठरली आहे.