
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील मूर्ती इथं विमानतळ मंजूर झाल्यानंतर त्यासाठीच्या भूसंपादनामुळं शेतक-यांमध्ये असंतोष पसरला आहे. या गावातील ७२० एकर शेती विमानतळासाठी घेतली जात आहे. यात अतिक्रमित शेती करणा-यांना कुठलाही मोबदला दिला जाणार नसल्यानं ते चिंतातुर झाले आहेत.
राज्य शासनानं चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात मूर्ती इथं विमानतळाला एप्रिल-२०१८ मध्ये मंजुरी दिली. या कामाला गती देण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आता कामाला लागली आहे. या विमानतळासाठी एकूण ७२० एकर जागा अधिग्रहीत केली जात आहे. यासाठी प्रतिएकर आठ लाख रुपये मोबदला दिला जातोय. आतापर्यंत सुमारे १९ शेतक-यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या. हे विमानतळ गावात होत असल्यानं आनंद आणि सोबतच शेती जात असल्याचं दुःखही बघायला मिळालं. ज्यांना शेतीचा मोबदला मिळणार आहे, त्यांच्यामध्ये जमीन जात असल्याचं दुःख आहे. पण पैशांचा योग्य विनियोग केल्यास दुसरी शेती ते घेऊ शकतात. मात्र, यामध्ये सुमारे ८० एकर जागा अशी आहे, ज्यावर मागील २५-३० वर्षांपासून १५ शेतकरी शेती करीत आहेत. पडीक जमिनीला सुपीक करून जगण्याचं साधन म्हणून ते ही शेती करीत आहेत. जमीन शासकीय असली, तरी आम्ही ती वाहात असल्यानं त्याचा मोबदला द्यावा, अशी मागणी या शेतक-यांची आहे. अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असा इशाराही ते देत आहेत.
जमीन सरकारी असल्यानं मोबदला मिळणार नाही, हे आधीच महसूल विभागानं स्पष्ट केल्यानं याच गावातील अतिक्रमीत शेती करणारे शेतकरी जनार्दन डाखरे यांचा हृदयविकारानं दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. शासनानं असा दुजाभाव करू नये. किमान त्यांना सानुग्रह मदत तरी द्यावी, अशी मागणी आता शेतकरी संघटनेनं केली आहे. या विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होण्यास आणखी वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. कारण यात अडीचशे एकर जागा वनविभागाची आहे. ही जागा विमानतळाला वळती करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनानं महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला पाठवला असून, तिथून तो केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतरच जागेचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळं वनविभागाची जागा मिळवणं, हे मोठं आव्हान असणार आहे.
एखादा मोठा प्रकल्प सुरू होताना मिळणारा संभाव्य रोजगार, अपेक्षित विकास, यामुळं गावकरी खूष असतात. पण त्यासाठी भूमिहीन होण्याची पाळी येत असल्यानं गावक-यांत कही खुषी कही गम असं वातावरण आहे.































































