एनडी बारचा परवाना रद्द करा, पप्पू देशमुख यांची पालकमंत्र्यांकडे तक्रार

चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये वाहन तळाच्या जागेत असलेल्या एनडी रेस्ट्रो बार समोर मद्यप्राशन करून झोपलेला उमंग दहिवले यांच्या शरीरावरून एकापाठोपाठ दोन वाहन गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करावी तसचे या बारसंदर्भात अनेक तक्रारी असल्याने तो बार बंद करावा, अशी मागणी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे.

एनडी रेस्ट्रो बार नियम डावलून रात्री 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येते. या बारमध्ये अल्पवयीन मुला-मुलींना प्रवेश देण्यात येतो अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. या बारमध्ये मारहाणीच्या गंभीर घटना घडल्या आहेत. मात्र पोलीस विभागाकडून कारवाई करण्यास नेहमी टाळाटाळ करण्यात येते. या बारला परवाना देताना नियम डावलण्यात आले. त्यामुळे या बारचा परवाना रद्द करण्यात यावा, तसेच चंद्रपूर शहर व जिल्ह्यात नियम डावलून लोकवस्तीमध्ये मंजुरी देण्यात आलेल्या सर्व दारू दुकानांचे परवाने रद्द करण्यात यावे, दारू दुकान वाटप करताना मोठा गैरव्यवहार झाला असून या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस विभागातील दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देशमुख यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

या बारला मंजूरी देण्याच्या काही दिवसांपूर्वीच रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये गोळीबारची घटना घडली होती. या परिसरामध्ये मनपाचे माजी नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर अज्ञात गुंडांनी हल्ला केला होता. कायदेशीर दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये या बारला नियम डावलून परवानी देण्यात आली. रघुवंशी कॉम्प्लेक्सच्या पूर्वेला हिंदी सिटी व मराठी सिटी हायस्कूल तसेच पश्चिमेला लागून लोकमान्य कन्या विद्यालय आहे. रघुवंशी काँग्रेसमध्ये अनेक शैक्षणिक संस्था व्यापारी संकुल असल्यामुळे दिवसभर महिला व मुलींची वर्दळ असते बार सुरू झाल्याने या ठिकाणी येणाऱ्या महिला व मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे.