चंद्रपूर – तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या खोदकामात सापडला प्राचीन स्तंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर तहसील कार्यालयाच्या इमारतीचा बांधकामासाठी खोदकाम करीत असताना प्राचीन स्तंभ आढळला. हा स्तंभ बौद्ध धर्माशी निगडित असल्याचं काही इतिहासकार म्हणतात. मात्र पुरातत्त्व विभागाने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. या स्तंभामुळे चंद्रपूरच्या इतिहासात अधिक भर पडली आहे. स्तंभ ब्रह्मपुरी तहसील कार्यालय परिसरात आढळला. तहसील कार्यालयाची इमारत ब्रिटीशकालीन आहे. या इमारतीला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत.

चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यात अनेक गावात प्राचीन अवशेष विखुरलेले आहेत. चंद्रपूरच्या प्राचीन इतिहास पुन्हा एकदा उत्खनातून पुढे आला. जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात इंग्रजकालीन तहसील कार्यालयाची इमारत आहे. ही इमारत पाडून त्या ठिकाणी नवी इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. बांधकामाचे काम सुरू असताना इथ दगडी स्तंभ आढळला. स्तंभावर नक्षीकाम कोरलेला आहे. त्याखाली दोन हत्ती देवीचे अभिषेक करीत असतानाचे शिल्प कोरले आहे. काही इतिहासकारांच्या मते स्तंभावर कोरलेले शिल्प तथागत गौतम बुद्ध यांची आई महामाया यांचं आहे.

ब्रह्मपुरी शहराला प्राचीन इतिहास

ब्रह्मपुरी शहराला प्राचीन इतिहास लाभला आहे. सातवाहन राजा विजय याचा सोन्याची नाणी तालुक्यात सापडली होती. शहरापासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर असलेल्या उदापूर इथ प्राचीन काळातील इमारतीचे अवशेष आढळतात.तर पंधरा कि.मी.अंतरावर असलेल्या देवटेक येथे सम्राट अशोक कालीन शिलालेख सापडलेला होता.