
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानी अंतराळ संशोधन केंद्र म्हणजेच इस्रो महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. आता या मोहिमेसाठी अवघा आठवड्याभराचा काळ असल्याने मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. श्री हरिकोटा येथील इस्रोच्या तळावर रविवारी जीएसएलव्ही मार्क 3 लाँचपॅडवर स्थापन करण्यात येणार आहे. चांद्रयान-2 ची सर्व तयारी पूर्ण झाली असून रविवारी लाँचपॅडवर रॉकेट स्थापन करण्यात येणार असल्याचे इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले. मोहिमेची सुरुवात होण्यापूर्वी अंतिम तयारीची पाहणी13 जुलैला करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चांद्रयान-2 द्वारे इस्रो चंद्रांच्या दक्षिण धुव्रावर पोहचणार आहे. आतापर्यंत या भागात कोणत्याही देशाचे यान पोहचलेले नाही. त्यामुळे ही इस्रोची महत्त्वाकांक्षी योजना आहे. इस्रोने या भागात पोहचण्याची मोहिम हाती घेतल्याने चंद्राच्या या भागातील अभ्यासाला मदत होणार आहे. त्यामुळे याबाबतच्या संशोधनाला गती येणार आहे. या मोहिमेत असलेल्या धोक्यांचाही इस्रोने विचार केला असून धोके टाळून मोहिमेची आखणी करण्यात आली आहे. ही मोहिम यशस्वी होईल, असा विश्वास सिवन यांनी व्यक्त केला आहे. चांद्रयान-2 मध्ये विशेष रोवर असणाऱ्या ‘प्रज्ञान’ साठीचे तंत्रज्ञान कानपूरच्या आयआयटीमध्ये तयार करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी चंद्राच्या पृष्ठभागावर रोवर कधी आणि कुठे उतरणार याबाबतची योजना ठरवण्यात आली आहे. आयआयटी कानपूरचे इलेक्ट्रिकल इंजिनिअर विभागातील वरिष्ठ प्रोफेसर के. ए. व्यंकटेश आणि मॅकेनिकल इंजिनिअर विभागातील वरिष्ठ प्रोफेसर आशिष दत्ता यांनी याबाबतच्या योजनेची आखणी केली आहे. या यानात एकून तीन महत्त्वाचे मॉड्यूल आहेत. ऑर्बिटर, लँडर (विक्रम) आणि रोवर (प्रज्ञान) असे ते मॉड्यूल आहेत. चांद्रयान-2 चंद्रावर उतरल्यावर या मॉड्यूलचे काम सुरू होणार आहे. 1 सप्टेंबरला हे तीन मॉड्यूल चंद्रावर उतरणार आहेत. लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर भ्रमण करणार असून माहिती गोळा करणार आहे. तर रोवर चंद्रावरील माती आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी एकत्र करणार आहे. तसेच या मोहिमेतील खर्च कमी करण्यासाठीही वैज्ञानिकांनी प्रयत्न केले आहेत.
हिंदुस्थानची 10 वर्षांतील ही दुसरी चांद्रयान मोहीम आहे. चांद्रयान -1 मोहिम 2009 मध्ये राबवण्यात आली होती. मात्र, त्या यानात रोवरचा समावेश नव्हता. आताच्या चांद्रयान-2 मोहिमेत रोवरचा समावेश असल्याने चंद्राबाबतच्या अभ्यासाला आणि संशोधनाला अधिक गती येणार आहे. तसेच या मोहिमेतून नवी माहिती हाती येण्याचीही शक्यता आहे.
























































