
मंगळवारी 25 ऑक्टोबरला खंडग्रास सुर्यग्रहण (ग्रस्तास्त) असल्यामुळे शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने श्री साईबाबा समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दुपारी 4.40 ते सायंकाळी 06.31 यावेळेत श्रींचे समोर मंत्रोच्चार होणार असल्यामुळे मंत्रोच्चार होईपर्यंत भाविकांना समाधी मंदिराचे सभामंडपापासुन दर्शन सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
बानायत म्हणाल्या, 25 ऑक्टोबरला दुपारी 4.40 ते सायंकाळी 6.31 याकाळात खंडग्रास सुर्यग्रहण (ग्रस्तास्त) होणार आहे. यामध्ये दुपारी 4.40 वाजता श्रींचे दर्शन बंद होईल. दुपारी 4.50 वाजता समाधी मंदिरात मंत्रोपच्चार सुरु होईल, सायंकाळी 6.31 वाजता मंत्रोपच्चार संपल्यानंतर सायंकाळी 6.40 वाजता श्रींचे मंगलस्नान होईल. त्यानंतर सायंकाळी 6.55 वाजता श्रींची ‘शिरडी माझे पंढरपूर’ ही आरती होईल. सायंकाळी 7.15 वाजता श्रींची धुपारती होईल. आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी दर्शनरांगा पुर्वीप्रमाणे सुरु होईल. ग्रहण काळात श्रींच्या समोर मंत्रोच्चार होईपर्यंत भाविकांना समाधी मंदिराचे सभामंडपापासुन दर्शन सुरु ठेवण्यात येणार असल्याचे सांगत सर्व साईभक्तांनी याची नोंद घेत सहकार्य करावे, असे आवाहन बानायत यांनी केले आहे.


























































