
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
निवडणूक तोंडावर आलेली असली तरी काँग्रेसमधील सावळागोंधळ काही संपताना दिसत नाही. यापूर्वी चंद्रपूरमधून उमेदवारी दिलेल्या विनायक बंगाडे प्रचाराला लागलेले असताना ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करून सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याहीपेक्षा कहर म्हणजे काँग्रेसचे प्राथमिक सदस्यदेखील नसताना माजी खासदार सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आपल्याऐवजी आमदार पत्नी अमिता चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील असणारे काँगेसचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांचे प्रयत्न हाणून पाडत काँग्रेस हायकमांडने रविवारी त्यांनाच लोकसभेच्या आखाड्यात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. अशोक चव्हाण यांच्यासह देशभरातून काँग्रेसने चार माजी मुख्यमंत्र्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे.
काँग्रेसची आणखी एक यादी
शनिवारी मध्यरात्री जाहीर करण्यात आली. त्यात नांदेडचा समावेश आहे. त्यानंतर सायंकाळी महाराष्ट्रातील चार उमेदवारांची नावे जाहीर झाली. मात्र पुण्यातून काँग्रेसला अजूनही उमेदवार निश्चित करता आलेला नाही. त्यातच गोंधळलेल्या काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवारच बदलला. राष्ट्रीय राजकारणाऐवजी राज्याच्या राजकारणात सक्रिय राहण्यासाठी अशोक चव्हाण प्रयत्नशील होते. त्यामुळे आपल्याऐवजी पत्नी अमिता यांना लोकसभेला पाठवून विधानसभा लढविण्याचा अशोक चव्हाणांचा इरादा होता, मात्र काँग्रेस हायकमांडने त्याला खोडा घालत नांदेडमधून अशोक चव्हाणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. अशोक चव्हाणांचे कट्टर राजकीय विरोधक प्रताप पाटील-चिखलीकर यांना भाजपने नांदेडमधून संधी दिल्यामुळे नांदेडची जागा हातून जायला नको म्हणून काँग्रेसने अशोकरावांनाच निवडणूक लढविण्यासाठी सुचविल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. अकोल्यातून काँग्रेसने हिदायत पटेल यांच्या रूपाने मुस्लिम समाजाला संधी दिली आहे. रामटेकमधून माजी प्रशासकीय अधिकारी किशोर गजभिये यांना काँग्रेसने संधी दिली आहे.
माजी मुख्यमंत्री लोकसभेच्या मैदानात
अशोक चव्हाणांसह काँग्रेसच्या चार माजी मुख्यमंत्र्यांना काँग्रेसने लोकसभेच्या मैदानात उतरविले आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग भोपाळमधून, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत नैनितालमधून निवडणूक लढवतील तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली चिकमंगळूरमधून नशीब अजमावतील.
कार्ती चिदंबरम यांना तिकीट
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना काँग्रेसने तामीळनाडूच्या शिवगंगा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. कार्ती हे आयएनएक्स आणि एअरसेल-मॅक्सिस प्रकरणातील आरोपी असून ‘सीबीआय’ आणि ‘ईडी’कडून त्यांची चौकशी सुरू आहे. पी. चिदंबरम हे शिवगंगा मतदारसंघातून सात वेळा निवडून आले होते. 2014 मध्ये मात्र त्यांचा येथेच पराभव झाला होता.


























































