
सामना प्रतिनिधी । मुंबई
नायर रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर पायल तडवी हिच्या आत्महत्येनंतर पदवी महाविद्यालयांमध्ये ऍण्टी रॅगिंग नियमावलीचे पालन होत आहे की नाही याविषयी शंका निर्माण झाली आहे. मुंबई विद्यापीठाने रॅगिंग रोखण्यासाठी ऑक्टोबर 2016 आणि जून 2017 मध्ये रॅगिंगविरोधी नियम तयार केले खरे, पण या नियमांची महाविद्यालयांमधून अंमलबजावणी होते की नाही याची आजतागायत तपासणीच झाली नसल्याचे समोर आले आहे.
महाविद्यालयांमध्ये ऍण्टी रॅगिंग नियमावलींचे पालन होत नसल्याचे युवासेनेला मिळालेल्या माहितीत उघड झाले आहे. या माहितीच्या आधारे युवासेना सिनेट सदस्य प्रवीण पाटकर, डॉ. सुप्रिया करंडे, मिलिंद साटम, ऍड वैभव थोरात आणि युवा सेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांची नुकतीच भेट घेतली. महाविद्यालयांमध्ये रॅगिंगसारखे अनुचित प्रकार घडू नये यासाठी ऍण्टी रॅगिंग नियमावलींचे पालन होत आहे की नाही याची तपासणी करण्याची मागणी यावेळी युवासेनेच्या वतीने करण्यात आली. रॅगिंग नियमावली विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहीर करावी, अशी सूचनाही युवासेनेच्या वतीने यावेळी करण्यात आली.
ही आहे रॅगिंगविरोधी नियमावली
– रॅगिंग समिती तसेच ऍण्टी रॅगिंग पथक नेमणे
– ऍण्टी रॅगिंग सेलची व्यवस्था
– सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्म बेल बसवणे
– लायब्ररी, कॅण्टीन, वसतिगृह अशा महत्त्वाच्या ठिकाणी ऍण्टी रॅगिंग पोस्टर्स लावणे
– रॅगिंगविषयी माहिती पत्रक तयार करून वितरित करणे
– विद्यार्थ्यांशी समन्वय साधून त्यांचे समुपदेशन करणे, त्यासाठी सेमिनार घेणे
– रॅगिंगचे दुष्परिणाम दाखविणाऱया शॉर्टफिल्म दाखविणे.



























































