बाप रे बाप..! सात वर्षीय मुलाच्या तोंडात चक्क 526 दात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

साधारणत: माणसाच्या तोंडामध्ये 32 दात असतात. परंतु चेन्नईतील एका 7 वर्षीय मुलाच्या तोंडामध्ये चक्क शेकडो दात असल्याचे समोर आले. येथील सविता डेंटल कॉलेज हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी या मुलाच्या तोंडातून तब्बल 526 दात बाहेर काढले आहेत.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा Compound Composite Ondontome या आजाराने ग्रस्त होता. सविता डेंटल कॉलेज हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया विभागाचे प्रोफेसर सेंथिलनाथन यांनी सांगितले की मुलाच्या जबड्याला सूज आली होती. तीन वर्षाचा असल्यापासून त्याच्या जबड्याला वारंवार सूज येत होती. त्यावेळी त्याला जास्त त्रास होत नव्हता. परंतु आता वयानुसार त्रासही वाढल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू होते.

मुलाच्या जबड्याचा एक्सरे आणि सीटी स्कॅन करण्यात आले असता त्यात दातच दात दिसून आले. यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रोफेसर सेंथिलनाथन यांनी सांगितले. शस्त्रक्रियेदरम्यान मुलाच्या जबड्यामध्ये एक पिशवीसारखी गोष्ट दिसून आली. याचे वजन जवळपास 200 ग्राम होते. या पिवशीसारख्या गोष्टीतून विविध आकाराचे तब्बल 526 दात बाहेर काढण्यात आले तेव्हा डॉक्टरही हैरान झाले. ही शस्त्रक्रिया तब्बल 5 तास चालली.