शिवरायांचा अवमान करणारे अमंगलप्रभात राजीनामा द्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीशी आणि बेईमानीशी करणारे राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या निवासस्थानावर हजारो शिवसैनिकांनी धडक दिली. लोढा यांचा तीव्र निषेध करतानाच ‘शिवरायांचा अवमान करणारे अमंगलप्रभात, राजीनामा द्या!’ अशी जोरदार मागणीही यावेळी शिवसैनिकांनी केली. त्याचबरोबर शिवरायांचा इतिहास समजण्यासाठी लोढा यांना शिवरायांचा पराक्रम सांगणारे चौथीचे पुस्तकही यावेळी भेट देण्यात आले.

शिवसैनिकांनी गुरुवारी सकाळी केम्स कॉर्नर येथील मंगलप्रभात लोढा यांच्या गुरूकुल निवासस्थानावर मोर्चा नेला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना महाराष्ट्र कदापि माफ करणार नाही असे शिवसैनिकांनी यावेळी ठणकावून सांगितले. शिवसैनिकांनी लोढांविरोधी घोषणांनी केम्स कॉर्नरचा परिसर दणाणून सोडला.

शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, युगंधरा साळेकर यांच्यासह उपनेते रवींद्र मिर्लेकर आणि अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते.