छोटा शकीलच्या भावाकडून बांधकाम व्यावसायिकाला धमक्या, दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झोपु योजनेत पाच झोपड्या अपात्र ठरलेल्या असतानाही संबंधिताला त्या पाचही झोपड्यांच्या मोबदल्यात पुनर्विकासात घरे दे अन्यथा परिणाम वाईट होतील, असे बांधकाम व्यावसायिकाला धमकावणाऱया गँगस्टर छोटा शकीलच्या भावाच्या सहकाऱयासह एकाला खंडणीविरोधी पथकाने गजाआड केले.

ओशिवरा गावात अरबाज शेख याच्या सहा झोपड्या होत्या. मात्र झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत अरबाजची एक झोपडी पात्र ठरली तर उर्वरित पाच झोपड्या अपात्र ठरल्या. मात्र अरबाजला पाच झोपड्यांच्या मोबदल्यातदेखील घरे पाहिजे होती. त्यासाठी त्याने गँगस्टर छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेख याचा सहकारी कामरान याला बांधकाम व्यावसायिकाला धमकावण्यास सांगितले. त्यानुसार कामरानने अन्वर शेखला सांगितले. मग अन्वरने बांधकाम व्यावसायिकाला सतत संपर्क साधून अजरबाजला त्याची सर्व घरे दे, तसेच मला पण पैसे दे असे धमकावण्यास सुरुवात केली. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकाने गुन्हे शाखेकडे संपर्क साधला.

दरम्यान, ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय तरलगट्टी, एपीआय अरुण थोरात, वंजारी, उपनिरीक्षक लम्भे अंमलदार शिवाजी सावंत, रोहन सुर्वे, प्रीतम पांचाळ, दिलीप लोखंडे, कांबळे आणि शेरू शिंदे यांनी तपास सुरू करून अरबाज शेख आणि कामरान यांना अटक केली.