मुख्यमंत्र्यांवर विश्वास राहिला नाही! मनोज जरांगे स्पष्टच बोलले, आंदोलनाचा मार्ग ठरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम्ही आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला. जे जे मंत्री आम्हाला भेटले त्यांच्यावरही विश्वास ठेवला. पण मुख्यमंत्री विश्वासाला पात्र ठरले नाहीत. आता त्यांच्यावर विश्वास राहिला नाही, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत 20 जानेवारीला आंदोलन होणारच असा ठाम निर्धार व्यक्त करतानाच जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा मार्गही सांगितला.

मराठा आरक्षणासाठी मुंबईत आझाद मैदानावर करण्यात येणार्‍या आंदोलनाची रूपरेषा जाहीर करण्यासाठी मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांवर अतिशय कडक शब्दात टीका केली. मुख्यमंत्री आमच्या विश्वासाला पात्र ठरले नाहीत. मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेऊ, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. तो त्यांनी पाळला नाही. आंतरवाली सराटीत आमच्याच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. आताही आमच्याच कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. त्यामुळे वातावरण दूषित होत आहे. आमचे आंदोलन शांततेत चालू आहे. आम्ही लोकशाही मार्गानेच मुंबईत जात आहोत. पण सरकार मात्र कायदा पायदळी तुडवत आहे. आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितले.

आता चर्चा नाही
सरकारकडे 20 जानेवारीपर्यंतचा वेळ आहे. मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी घ्यावी. पण आता चर्चा वगैरे काही नाही. आम्हाला आरक्षण हवे आहे आणि ते आम्ही मिळवणारच. 20 तारखेनंतर एक तासच काय मिनिटभरही वेळ देणार नाही. कधीही पाहिली नसेल अशी गर्दी मुंबईत उसळेल. मुंबईकरांना थोडा त्रास होईल पण त्यांनी तो सहन करावा, असे आवाहनही यावेळी मनोज जरांगे यांनी केले.

असा आहे मार्ग
20 जानेवारी रोजी आंतरवाली सराटी येथून सकाळी 9 वाजता मराठा आंदोलक पायी दिंडीने मुंबईकडे कूच करतील. जालना, शहागड, गेवराई, नगर, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खराडी, शिवाजीनगर, पुणे, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूरमार्गे आंदोलक मुंबईत आझाद मैदानावर पोहोचतील. ज्या ज्या गावांतून ही दिंडी जाईल त्या त्या गावचे लोक त्यात सहभागी होतील. दिंडीच्या नियोजनाचे पीडीएफ करून कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे. दिंडी शांततेत निघणार असून, कार्यकर्त्यांनी फोटो काढण्यासाठी अजिबात गर्दी करू नये. जी तुकडी तुम्हाला दिली आहे, त्याच तुकडीत प्रत्येकाने राहायचे आहे. आपापल्या गाडीत दोन समन्वयक ठेवायचे आहेत. प्रत्येक तुकडीने आपापली जेवणाची सोय करायची आहे. रस्त्यातील गावांनीही मराठा आंदोलकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

सोबत या वस्तू घ्या
मराठा कार्यकर्त्यांनी अर्धा क्विंटल ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ सोबत घ्यावे. टॉर्च, मोबाईल चार्जर, कपडे, साबण, दूध पावडर, सरपण, तवा, पातेले असा सर्व संसार सोबत घ्यावा.