चिखली अर्बन बँकेची नेत्रदीपक कामगिरी; एकत्रित व्यवसाय 2 हजार कोटींचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात विश्वसनीय आर्थिक संस्था म्हणून नावारूपाला आलेल्या दि चिखली अर्बन को-ऑप. बँकेने संपलेल्या आर्थिक वर्षात नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या मार्गदर्शनात बँकेने २०१८-१९ मध्ये बाराशे कोटींच्या जवळ ठेवी जमा करण्यात यश मिळवले असून बँकेचा एकत्रित व्यवसाय देखील २००० कोटींच्या जवळ झाला आहे. यामध्ये सन २००१ साली बँकेच्या ठेवी या ११४ कोटी ३८ हजार होत्या कर्जे ७९ कोटी ६३ हजार इतक्या होत्या. त्यानंतर सन २००७ मध्ये त्या १९२ कोटी ७९ लाख कर्जे १३० कोटी ९७ लाख होत्या. त्या आजरोजी २०१८-१९ या सरत्या वर्षात ठेवी ११५० कोटी रुपये, कर्जे ७६७ कोटी रुपये तसेच ढोबळ नफा २२ कोटी तसेच खेळते भागभांडवल १३२२ कोटी पर्यंत पोहोचला आहे. याद्वारे ग्राहक आणि ठेवीदारांचा विश्वास प्राप्त करण्यात चिखली अर्बन मागील आर्थिक वर्षात यशस्वी ठरली असून, या उपलब्धीबद्दल बँकेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

विदर्भातील पहिली नागरी सहकारी बँक असलेल्या दि चिखली अर्बन को-ऑप. बँकेने आपली ५८ वर्षांची उल्लेखनीय वाटचाल यशाचे अनेक टप्पे गाठत पूर्ण केली आहे. विदर्भातील महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेली व बुलढाणा, अकोला व वाशिम जिल्ह्यासह मराठवाड्यातील जालना व संभाजीनगर आणि खान्देशातील नाशिक व जळगाव या ७ जिल्ह्यात बँकेच्या २९ शाखा व ८ ग्राहक सेवा केंद्रे कार्यरत आहेत. संपूर्ण संगणकीकृत व अद्यायावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून बँक आपल्या ग्राहकांना तत्पर सेवा देत असते. याशिवाय शहरी व ग्रामीण भागातील उद्योजक, व्यावसायिक, प्रगतीशील शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांना चिखली अर्बन बँकेकडून अर्थसहाय्य केले जाते. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून महिला बचत गटांना देखील मायक्रो फायनांसद्वारे छोटी कर्जे बँक देत असते. या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे दि चिखली अर्बन बँकेचे कार्य तळागाळापर्यंत पोहचले असून समाजातील लहान – मोठे सर्व घटक बँकेशी जोडले गेले आहेत. या सर्वांच्या सहकार्यातून बँकेने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी पार पडली आहे.

ठेवी आणि एकत्रित व्यवसायात झाली भरघोस वाढ दि चिखली अर्बन को-ऑप. बँकेने सुपर बंपर ठेव योजना, सुकन्या लक्षाधीश ठेव योजना, डबल बंपर ठेव योजना अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण व उपयुक्त ठेव योजना प्रभावीपणे राबवल्या. या माध्यमातून समाजातील शेतकरी व्यापारी, नोकरदार, महिला, पेंशनर यांच्या कडून मोठ्या प्रमाणात बँकेला ठेवी प्राप्त झाल्या. या व्यतिरिक्त बँकेने कर्ज वितरण, बी.बी.पी.एस., गुंतवणूक आदी माध्यमातून विविध प्रकारे आपल्या व्यवसायात भरभक्कम वाढ केली. बँकेचे या आर्थिक वर्षात भागभांडवल ३३ कोटी रुपये झाले असून एकूण ठेवी ११४७ कोटी १० लाख पर्यंत पोहोचल्या आहे. एकूण कर्ज ७६७ कोटी १३ हजार रुपये लक्ष बँकेने गाठले आहे. असा एकत्रित व्यवसाय १९१४ कोटी १० लाख ७२ हजर इतका झाला असून सोबतच नफा हा २२ कोटी १६ लाख इतका झाला आहे. आर्थिक निकषांमध्ये बँकिंग क्षेत्रात महत्वाचे निकष म्हणून मानल्या जाणार्‍या एनपीए या संकल्पनेत बँक पुरेपूर खरी उतरली आहे त्याचे रिझर्व बँकेच्या निकषांचे पालन बँकेने केले असून ठोबळ प्रमाण हे ०५.४७ टक्के तर नक्त प्रमाण हे ०२.३५ टक्के इतके ठेवण्यात बँकेला यश आले आहे. याबाबत बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी कर्जदार, ग्राहक यांचे आभार मानले आहे.

ग्रामीण भागातून सुरुवात झालेल्या चिखली अर्बन बँकेने बजावलेली ही नेत्रदीपक कामगिरी सहकारी बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय समजली जाते. शिवाय समाजात सुद्धा बँकेची पत आणि विश्वास वाढण्यास यामुळे मोलाचा हातभार लागणार आहे. येणार्‍या काळात दि चिखली अर्बन को-ऑप. बँक यापेक्षाही अधिक चमकदार कामगिरी बजावेल असा विश्वास बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी व्यक्त केला असून, या उपलब्धीमध्ये योगदान देणारे बँकेचे भागधारक, ग्राहक, खातेदार व हितचिंतकांचे आभार गुप्त यांनी संचालक मंडळाच्या वतीने मानले आहेत.