
गुजरातच्या एका छोट्याशा गावातील मुलाच्या आयुष्यावर आधारित छेल्लो शो या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड करण्यात आली होती. या चित्रपटात मुख्य भूमिका करणाऱ्या बालकलाकाराचं निधन झालं आहे.
राहुल कोली असं या दहा वर्षांच्या मुलाचं नाव आहे. राहुल याला रक्ताचा कर्करोग होता. त्यामुळे त्याला 2 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, या गंभीर आजारामुळे राहुल याचं निधन झालं. गेल्या चार महिन्यांपासून अहमदाबाद येथे त्याच्यावर उपचार सुरू होते. चित्रपटाच्या चित्रीकरणानंत राहुल याला कर्करोगाचं निदान झालं होतं.
राहुल हा मूळचा हप्पा या गावचा रहिवासी आहे. राहुलचे वडील रामू हे रिक्षाचालक आहेत. राहुल खूप खूश होता. तो म्हणायचा की आपलं आयुष्य 14 ऑक्टोबर नंतर एकदम बदलून गेलेलं असेल. पण, त्यापूर्वीच तो आपल्याला सोडून गेला, अशा शब्दांत रामू कोली यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियातर्फे छेल्लो शो या गुजराती चित्रपटाची निवड 95व्या ऑस्कर अॅकॅडमी पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. पॅन नलिन उर्फ नलिन पंड्या यांच्या चरित्रावर आधारित हा चित्रपट असून त्यात त्यांच्या लहानपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास उलगडण्यात येणार आहे. हा चित्रपट येत्या 13 ऑक्टोबर रोजी लास्ट फिल्म शो या नावाने हिंदीत प्रदर्शित करण्यात येत आहे.



























































