
कुतूहल माणसाला शांत बसू देत नाही. कुतूहलामुळेच अनेक गोष्टींचा शोध लागला ,तसेच नवनवीन अविष्कार करण्यात आले. मात्र, अजाणत्या वयातील कुतूहल अंगलट येण्याची शक्यता असते. आपल्याला नेमकी लघवी कशी होते, ती कुठून येते, असे प्रश्न एका 13 वर्षांच्या मुलाला पडले. हे प्रश्न आणि कुतूहल त्याला शांत बसू देत नव्हते. कुतूहलापोटी त्याने मूत्रमार्गात दोन फूट लांबीची तार घातली.
विज्ञानात काही गोष्टी तपासण्यासाठी आणि शोध घेण्यासाठी अनेक प्रयोग केले जातात. याची मुलाला माहिती मिळाली. त्यानेही आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रयोग करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने 2 फूट लांबीची वायर घेतली. त्यातील तार त्याने वेगळी काढली. त्यानंतर लघवी नेमकी कुठून येते, ती कशी तयार होते, हे शोधण्यासाठी ती तार त्याने थेट मूत्रमार्गात घातली. ही घटना चीनच्या दांगुआन भागात घडली.
काही दिवसांनी मुलाला लघवीतून रक्त पडण्याचा त्रास होऊ लागला. त्रास वाढल्यावर तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याला एक्स रे काढण्यास सांगितले. त्याचा एक्स रे पाहून डॉक्टरही चक्रावले. त्या मुलाच्या मूत्राशयात मोठी तार असल्याचे डॉक्टरांना एक्सरे मधून दिसून आले. ही तार मूत्राशयात कशी गेली असा प्रश्न डॉक्टरांना पडला.
डॉक्टरांनी मुलाला विश्वासात घेत विचारणा केली. तेव्हा लघवी कशी होते आणि ती कुठून येते, हे शोधण्यासाठी आपण तीन महिन्यांपूर्वी मूत्रमार्गात तार घालत होतो. तार आत गेल्यावर अचानक आपल्या हातातून निसटली आणि पूर्ण आतमध्ये गेली. त्यानंतर आपल्याला काहीच त्रास झाला नाही. तसेच घरच्यांच्या भीतीने आपण ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही, असे मुलाने डॉक्टरांना सांगितले.
ही तार बाहेर काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्यासाठी त्या मुलालार सॉन्गशन लेक सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुमारे तासभर शस्त्रक्रिया करून सुमारे 70 सेंटीमीटर लांबीची तार मूत्राशयातून बाहेर काढली. ही तार तीन महिने मूत्राशयात असूनही मुलाला गंभीर जखम झाली नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. तसेच कुतुहलापोटी शरीरावर प्रयोग करू नये, अशी समजही डॉक्टरांनी मुलाला दिली आहे.
























































