
अनेक वर्षे एकच अपत्य योजना कठोरपणे राबवणाऱ्या चीनसमोर आता अनेक संकटे उभी राहत आहेत. एकच अपत्य योजनेमुळे लिंग गुणोत्तरात मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे एकूण लोकसंख्येमध्ये वृद्धांची संख्या वाढली असून कार्यक्षम व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याचे नवे संकट चीनसमोर उभे राहिले आहे. या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी चीन आता जास्तीतजास्त मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
सरकारकडून जास्त मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच अनेक कंपन्याही मुले जन्माला घालणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विविध ऑफर देत आहेत. याबाबत एका कंपनीने दिलेल्या ऑफरची जोरदार चर्चा आहे. तिसरे अपत्य जन्माला घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक वर्षाची सुटी आणि 11.50 लाख रुपयांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे. या ऑफरमुळे ही कंपनी चर्चेत आहे. चीनच्या ‘नेशनल बिजनेस डेली’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
लिंग गुणोत्तरातील तफावत, अनेक मुलांची लग्न न होणे, सुखासीन जीवनशैली यामुळे अनेकजण मुले जन्माला घालणे टाळत आहे. त्यामुळे चीनमधील संकटे वाढण्याची चिन्हे आहेत. चीनमध्ये लोकसंख्येतील विषमता आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य संकटाचा मुकाबला करण्यासाठी सरकार जास्तीतजास्त मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी बेबी बोनस, एक्सटेंडेड पेड लीव्स, करात छूट, मुलांच्या पालनपोषणासाठी सबसिडी अशा प्रकारच्या अनेक सुविधा देण्यात येत आहेत. जास्तीतजास्त दाम्पत्यांनी तिसरे अपत्य जन्माला घालावे, यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहे. अपत्य जन्माला घालण्यासाठी सरकारसह विविध कंपन्याही कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत.
टेक कंपनी Beijing Dabeinong Technology Group ने आपल्या कर्मचाऱ्यांना तिसरे अपत्य जन्माला घालण्यासाठी दिलेल्या ऑफरची सध्या चर्चा आहे. तिसरे अपत्य जन्माला घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना 90 हजार युआन( सुमारे 11.50 लाख रुपये) बोनस म्हणून रोख देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना वर्षभराची सुटीही देण्यात येणार आहे. महिला कर्मचाऱ्यांना वर्षभराची सुटी मिळेल. तर पुरुष कर्मचाऱ्यांनी 9 महिने पालकत्वाची सुटी मिळणार आहे.
ही कंपनी तिसरे अपत्य जन्माला घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना घसघशीत ऑफर देत आहे. त्याचप्रमाणे पहिले आणि दुसरे अपत्य जन्माला घालणाऱ्यांनाही विविध ऑफर देण्यात येत आहेत. पहिले अपत्य जन्माला घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना 90 हजार युआन (सुमारे3.54 लाख रुपये) आणि दुसरे अपत्य जन्माला घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना 60 हजार युआन (सुमारे 7 लाख रुपये) बोनस देण्यात येत आहेत.
चीनमधील अनेक प्रांतात सरकारनेही जनतेने अपत्यांना जन्म द्यावा, यासाठी बोनस देण्यास सुरुवात केली आहे. Panzhihua शहरात दुसरे किंवा तिसरे अपत्य जन्माला घालणाऱ्या नागरिकांना दर महिन्याला 500 युआन (सुमारे 6 हजार रुपये) देण्याची घोषणा केली आहे. तसेच चीनमध्ये सरकारने 98 दिवसांच्या मातृत्व रजेची तरतूद केली आहे. एकच अपत्य योजनेमुळे आता चीन संकटात सापडला आहे. जुने धोरण सोडून मुले जन्माला घालण्यासाठी बोनस देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.



























































