चिपळूण जवळील वालोपे येथे भीषण अपघात; कार 30 फूट दरीत कोसळून एकाचा मृत्यू, दोन बालकांसह पाच जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण नजीक असलेल्या वालोपे येथील एचपी पेट्रोल पंपासमोर बुधवारी पहाटे एक अत्यंत भीषण अपघात घडला. मुंबईहून चिपळूणच्या दिशेने येणाऱ्या एका कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट 25 ते 30 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान बालकांचा समावेश असल्याने परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बुधवार, 20 मे 2026 रोजी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडला. एक कार मुंबईवरून चिपळूणकडे येत असताना वालोपे येथील पेट्रोल पंपाजवळ पोहोचली. याच दरम्यान चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार रस्त्याशेजारील खोल दरीत जाऊन कोसळली. या मोठ्या अपघाताच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच चिपळूण येथील गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसजवळ तैनात असलेली ‘जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्था’ संचलित 24 तास मोफत अपघात सेवा रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

या भीषण अपघातात मार्कंडी येथील रहिवासी संजय जाधव यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी कामथे सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अपघातातील जखमींमध्ये अप्रिन सावंत (वय 44, रा. मुंबई), रीधा मोडक (वय 28, रा. मुंबई), उजेर मुल्ला (वय 9, रा. चिपळूण), रिया मुल्ला (वय 36, रा. चिपळूण) आणि आईल मुल्ला (वय 4, रा. चिपळूण) यांचा समावेश आहे. या दोन्ही बालकांसह सर्व जखमींवर सध्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्ग परिसरात काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.