पाद्र्याच्या सांगण्यावरून उपोषण करणाऱ्या 47 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाद्र्याच्या सांगण्यावरून उपोषणाला बसलेल्या 47 जणांचा मृत्यू झाल्याची घटना केनिया येथे घडली आहे. केनियाच्या पूर्वेला असलेल्या दफनभूमीतून 47 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सदर पाद्र्याला अटक करण्यात आली आहे. या 47 जणांना त्याने उपोषण केल्यास स्वर्गप्राप्ती होईल असं आश्वासन दिलं होतं.

केनियातील मलिंदी येथील पोलिसांनी पॉल मॅकेंजी या पाद्र्याला अटक केली आहे. पॉलच्या सांगण्यावरून सुमारे 15 जणांनी आमरण उपोषण करण्याचा निश्चय केला होता. जर आमरण उपोषण केलं तर तुम्ही येशू ख्रिस्ताला भेटायला स्वर्गात जाल, असं त्याने या 15 जणांना सांगितलं होतं. त्यानंतर या सगळ्यांनी उपोषण सुरू केलं आणि त्यांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे त्यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर या हत्यांना वाचा फुटली. त्यांनी अजून चौकशी केल्यानंतर सुमारे 47 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दफनभूमी आणि आसपासच्या जंगलात शोधमोहीम राबवली. त्यात त्यांनी 47 मृतदेह हस्तगत केले आहेत. अद्याप हा शोध सुरू आहे. ही दफनभूमी पाद्र्याच्याच खासगी मालकीची आहे. त्यामुळे पाद्र्याने फक्त उपोषणाला बसवून इतक्या लोकांचा जीव घेतला की अन्य काही कारण आहे, याचा शोध घेतला जाणार आहे.