सिटी सेंटर मॉल दिवाळीनंतरच सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई सेंट्रल येथील आग लागलेल्या सिटी सेंटर मॉलच्या दुसऱया आणि तिसऱया मजल्यावरील स्लॅब धोकादायक झाल्याचे स्ट्रक्चरल कन्सलटंटने पालिकेला सांगितले आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुकाने सुरू करण्यास परवानगी मागणाऱया व्यावसायिकांना पालिकेने परवानगी नाकारली आहे. आगीच्या दुर्घटनेत मॉलच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले असून रीतसर ऑडिट आणि दुरुस्तीनंतरच गाळेधारकांना परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे सिटी सेंटर मॉल दिवाळीनंतरच सुरू होणार आहे.

सिटी सेंटर मॉलला 22 ऑक्टोबरला लागलेली भीषण आग तब्बल 56 तासांनंतर पूर्णपणे नियंत्रणात आली. या मॉलमधील मोठय़ा प्रमाणावर इलेक्ट्रिक सामानासह फर्निचर जळाल्याने निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेने इमारतीच्या बांधकामालाही मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर पूलिंग ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून स्ट्रक्चरल कन्सलटंट आणि मॉलची मूळ इमारत बांधणाऱया कंत्राटदाराकडून इमारतीचे प्राथमिक ऑडिट करण्यात आले. यावेळी आगीमुळे इमारतीच्या स्लॅबला मोठा फटका बसला असून दुसऱया आणि तिसऱया मजल्यावरील स्लॅब धोकादायक बनल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटची गरज असल्याचे सुचवण्यात आले. या पार्श्वभूमीवर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.