
अहिल्यानगर तालुक्याच्या दक्षिण भागात मंगळवारी ढगफुटीसदृश पाऊस कोसळल्याने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. यामुळे पूर्वा व वालुंबा या नद्यांना पहिल्यांदाच महापूर आला असून, पाणी शेतात घुसले आहे. पुरामुळे गावा-गावांचा संपर्क तुटला असून, खडकी येथे जनावरे, तर सारोळा कासार येथे वाहने वाहून गेली आहेत. जागोजागी रस्तेही वाहून गेले आहेत. त्यामुळे मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाचजणांची पुराच्या पाण्यातून सुटका
ढगफुटीसदृश पाऊस कोसळल्याने पूर्वा व वालुंबा नद्यांना पूर आला. या दोन नद्यांचा संगम खडकी गावाजवळ असून, येथे दोन्ही नद्यांचे पाणी एकत्र होऊन गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. या पुराच्या पाण्यात नदीकाठी राहणारे शहाजी कोठुळे यांच्या कुटुंबातील पाचजण अडकले होते. त्यांची सुखरूप सुटका करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले.स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यात उतरून दोरखंडाच्या साहाय्याने पुरात अडकलेल्या पाचजणांची सुखरूप सुटका केली.
खासदार नीलेश लंके, आमदार दाते यांचा ‘आपत्ती व्यवस्थापन’शी संपर्क
चास, कामरगाव परिसरांत पावसाने तुफान ‘बॅटिंग’ केल्याने पूर्वा व वालुंबा नदीला पूर आला. पुराचे पाणी अक्षरशः नागरिकांच्या घरात शिरले. खडकी येथील नागरिक पुराच्या वेढय़ात सापडल्याचे नागरिकांनी खासदार नीलेश लंके व आमदार काशिनाथ दाते यांना माहिती दिली. खासदार लंके व आमदार दाते यांनी तातडीने आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती देत तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या.
फळबागांचे नुकसान
काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने भाजीपाला, कांदा, आंबा, केळी, पपई आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे शेतकऱयांची दाणादाण उडाली. यामुळे हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली. शेतकऱयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शेतकऱयांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आणखी वाढणार आहे.अवकाळीच्या हजेरीमुळे ग्रामीण भागातील पाण्याचे तलाव, ओढे-नाले तुडुंब भरले आहेत.


































































