बंगळुरू-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी आता कोरेगाव सातारा येथील जागा देण्यात येणार आहे. यासाठी भूसंपादन प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे बल्क ड्रग पार्कची सुरुवात दिघी पोर्टतून सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या ऍपेक्स ऑथोरिटीच्या पहिल्या बैठकीत दिली.
औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या ऍपेक्स ऑथोरिटीच्या पहिल्या बैठकीत राज्यातील टेक्स्टाईल पार्क, मेडिकल पार्क आणि बल्क ड्रग पार्क हे प्रस्तावित असून या पार्क्सला केंद्र शासनाने लवकरात लवकर मान्यता दिल्यास या पार्क्सचे काम जलदगतीने सुरू होऊन राज्याला आणि पर्यायाने केंद्रालाही मोठा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
वाराणसी-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर
या बैठकीदरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी वाराणसी-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचे काम हाती घेण्याबाबत या बैठकीत सूचना केली. हा प्रकल्प राज्याला हितकारी असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सूचनेला अनुमोदन दिले. वाराणसी-मुंबई कॉरिडॉर झाल्यास आजूबाजूच्या परिसराचा विकास होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
























































