
स्वच्छ-सुंदर मुंबईच्या नावाखाली मुंबईत सुरू असलेल्या कामात मुख्यमंत्र्यांकडून पालिकेवर ‘एसआरए’सारख्या राज्य सरकारच्या अखत्यारीतीमधील प्राधिकरणांमधील स्वच्छतेची जबाबदारीदेखील लादली जात असल्यामुळे कर्मचाऱयांवर कामाचा प्रचंड ताण वाढत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी असलेल्या अस्वच्छतेबाबत पालिकेला जबाबदार धरून मुख्यमंत्री पालिका कर्मचाऱयांना फैलावर घेत दबाव आणत असल्यामुळे पालिका कर्मचाऱयांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी कुर्ला येथील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीला भेट दिल्यानंतर प्रशासनाला धारेवर धरले. स्थानिकांना तातडीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दररोज पाच वेळा स्वच्छतागृहांची स्वच्छता करावी, पालिकेच्या खर्चाने त्याची दुरुस्ती, डागडुजी करावी आणि तसे न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱयाला कारणे दाखवा नोटीस बजावावी, कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आयुक्त चहल यांना दिले. मात्र पालिकेवर राज्य सरकारच्या अखत्यारीतील प्राधिकरणांच्या स्वच्छतेची जबाबदारी टाकली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. ‘बीपीटी’ परिसरातील असाच प्रकार घडला होता.
पालिका आयुक्त गप्प का?
‘एक तारीख एक तास’ या मोहिमेचा शुभारंभ गिरगाव चौपाटी येथे झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एसआरए वसाहतीला भेट दिली. या ठिकाणी साफसफाई होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अधिकारी आणि ठेकेदार यांना चांगलेच फैलावर घेतले. विशेष म्हणजे खुद्द आयुक्तांच्या समोरच कर्मचारी-अधिकाऱयांची खरडपट्टी काढली जात असूनही आयुक्तांकडून आपल्या कर्मचाऱयांची बाजू मांडली जात नसल्याने कर्मचारी अधिकाऱयांमध्ये नाराजी आणखी वाढली आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांना प्राधिकरणांच्या जबाबदारीची माहितीच नाही का असा सवालही उपस्थित केला जात आहे.
























































