मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दिल्या ईदच्या शुभेच्छा, नेटकर्‍यांनी म्हटले जय श्री राम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलकाता

आज संपूर्ण जगात ईद हा सण साजरा होत आहे. सोशल मीडियावर लोक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ट्विटरवरून ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर नेटकर्‍यांनी त्यांना ट्रोल करून कमेंटमध्ये जय श्री राम म्हटले आहे.

बंगालचे राजकारण राम नामाच्या घोषणांनी चांगलेच तापले आहे. ममता दीदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “ईद उल फितरच्या सर्वांना शुभेच्छा, धर्म हा प्रत्येकाचा वैयक्तिक विश्वास आहे. परंतु सण सर्वांसाठी आहे. या विचाराला एकत्र घेऊन आपण पुढे जाऊन आणि शांती आणि बंधुभावाने राहू.”

या ट्विटच्या कमेंट बॉक्समध्ये नेटकर्‍यांनी जय श्रीराम म्हटल आहे. अनेकांनी काही व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात लोक जय श्री रामच्या घोषणा देताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जींचा ताफा जात असताना काहींनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. त्यावर ममता दीदी चांगल्याच भडकल्या होत्या. गाडीतून खाली उतरून त्यांनी आपला रागही व्यक्त केला होता. त्यानंतर नेटकर्‍यांनी ममता दीदींना चांगलेच लक्ष्य केले. त्यांच्या फेसबुक प्रोफाईल फोटोवरही जय श्रीराम कमेंट करण्यास सुरूवात केली. काहींनी टिक टॉक व्हिडीओ बनवूनही त्यांची खिल्ली उडवली आहे.