पुण्यातील येरवडा परिसरात इमारत दुर्घटना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तत्काळ मदतीचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाला. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतील जखमींना चांगले उपचार मिळावेत तसेच मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत त्यांनी यंत्रणांना निर्देश दिले आहेत.

इमारतींचे बांधकाम तसेच अन्य कामांच्या ठिकाणीही जीवितहानी होऊ नये, यासाठीच्या सुरक्षा उपाय योजनांची खबरदारी घेण्यात यावी. त्याबाबत संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली.

बांधकाम व्यावसायिकासह तिघांवर गुन्हा

याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिक, लेबर सुपरवायझर, सेफ्टी सुपरवायझरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच लाखांची मदत

ही दुर्घटना दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.

पंतप्रधानांकडून सहवेदना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहवेदना व्यक्त केल्या. दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना ट्विट करत केली आहे.