ऑगस्ट क्रांती मैदानात स्वातंत्र्यलढय़ाचे स्मारक उभारा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील. स्वराज्य आधी की सुराज्य आधी हा मुद्दा तेव्हा होता. पण या 75 वर्षांनंतरही सुराज्य आलं का? याचा विचार कोण करणार? बलिदान देऊन हे स्वातंत्र्य मिळाले आहे. आपल्या पिढीला ते आयतं मिळालं, पण आता या स्वातंत्र्याचं तेज आपण जपायला हवे. हे ऑगस्ट क्रांती मैदान बोलायला हवं, तो इतिहास जिवंत करणारे स्मारक इथे झाले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

‘आजादी का अमृत महोत्सव’ या ऑगस्ट क्रांती मैदान येथील अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ऑगस्ट क्रांती मैदान हे एक रणमैदान होते. 1942 ला गवालिया टँक मैदानातून स्वातंत्र्याची सुरुवात झाली. त्यावेळचे दृश्य कसे असेल हे आठवण्याचा प्रयत्न केला तर या मैदानाचे महत्त्व लक्षात येते. हा स्वातंत्र्याच्या लढय़ाचा इतिहास जिवंत ठेवणे, हे स्वातंत्र्य प्राणपणाने जपणे आणि त्याचे सुराज्यात रूपांतर करणे हे आपले कर्तव्य आहे. इतिहास जिवंत ठेवणे व तो पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे हे आपले कर्तव्य असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय, बंदरे व वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख,  सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख उपस्थित होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार अरविंद सावंत, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सीताराम पुंटे, सांस्पृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, माहिती व जनसंपर्प महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सांस्पृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आदी उपस्थित होते.

शहीदांना अभिमान वाटेल असा देश निर्माण करू शकलो का?

स्वातंत्र्यदिनाचा नुसता उत्सव नाही. स्वातंत्र्य चळवळीत सर्वसामान्य जनतेने जातपात, धर्म यापलीकडे जाऊन देशाप्रति भावना दाखविली. स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करतो आहोत. बलिदानाची आठवण पण ठेवत आहोत. जे शहीद झाले त्यांची आठवण काढतो, पण हे  तेवढय़ापुरतेच मर्यादित नाही. ज्यांनी बलिदान केले आहे त्यांना अभिमान वाटेल असे जगणे,  असा देश आपण उभा करू शकलो का, स्वराज्याबरोबरच सुराज्य आणू शकतो का हा विचार व्हावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हणाले.