कोरोना रुग्णांचा खर्च राज्य सरकार करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने व्यायामशाळा, मॉल,जलतरण तलाव आणि सिनेमाघरे 30 मार्चपर्यंत बंद केली आहेत. तसेच राज्यातील सरकारी आणि खासगी शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. त्यामुळे जनतेने घाबरण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णांचा खर्च राज्य सरकार करेल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

कोरोनाचा फैलाव वाढणार नाही, यासाठी राज्य सरकार सतर्क असून उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच दक्षतेने संशयित आणि रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. कोरोनाच्या रुग्णांच्या उपचारासाठी व्हेंटिलेटर्स आणि बेडसची सोय करण्यात आली आहे. गरज भासल्यास नवे व्हेंटिलेटर्स घेण्याची तयारी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आवश्यक सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत. कोरोनाच्या रुग्णांचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे दिसत नाहीत. मात्र, रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी काळजी घेण्यात येत आहे. उपचारांपेक्षा काळजी घेणे कधीही चांगले. त्याप्रमाणे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नियोजन आणि उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सध्याची परिस्थिती बघता सगळीकडे बंदी घालून चालणार नाही. मात्र, गर्दी होत असलेल्या ठिकाणी बंदी घातली आहे. जनतेनेही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. ट्रेन ,बस यांसारख्या अत्यावश्यक सेवा बंद करता येणार नाहीत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, स्वतःची काळजी घ्यावी. सगळ्यांनी मास्क लावण्याची गरज नाही. शिंकताना आणि खोकताना स्वच्छ हातरुमाल तोंडावर धरावा. तसेच अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचा निर्णय विरोधकांना विश्वासात घेऊन घेतला आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.