पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्याचा प्रकल्प वेगाने पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जलसंपदा विभागाने हाती घेतलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प यात पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविणे, वैनगंगा-नळगंगा प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण करावेत. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आंतरराज्य स्तरावर काही अडीअडचणी येत असतील तर संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मी स्वतः बोलेन. पण विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी विभागाने कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पासंदर्भात आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विभागामार्फत होत असलेल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. तसेच नदीजोड/वळण योजना राबविण्याबाबत अतिरिक्त पाणी उपलब्ध असलेला प्रदेश आणि पाण्याची तूट असलेला प्रदेश याची माहिती दिली. यात पूर्व विदर्भ (वैनगंगा खोरे), नार पार-दमणगंगा, वैतरणा, उल्हास नदी खोरे, पिंजाळ, उल्हास खोरे यात अतिरिक्त असलेले पाणी अनुक्रमे विदर्भातील अवर्षण प्रवण भाग, मराठवाडा व खान्देश, नाशिक तसेच मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे (घरगुती व औद्योगिक वापर) या पाण्याची तूट असलेल्या प्रदेशात देण्याबाबतची माहिती दिली. पाण्याचे दुर्भिक्ष आहे त्या ठिकाणी पाणी मिळाल्यानंतर त्या भागात महत्त्वाचा बदल होईल, सिंचन क्षेत्र वाढेल असेही त्यांनी सांगितले. तसेच वळण बंधाऱयांना प्राधान्य द्यावे. हे प्रकल्प ‘मिशन मोड’वर हाती घेण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.

कोकणातील लोकांची गरज पूर्ण करून अतिरिक्त पाणी वळवावे – एकनाथ शिंदे

कोकणातील जे प्रकल्प मंजूर झाले आहेत त्याचाही प्राधान्याने विचार करावा. त्यासंदर्भात काही अडीअडचणी असतील तर त्या विभागाने दूर कराव्यात. कोकणातील लोकांची गरज पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त पाणी पुढे वापरावे, अशा सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.