मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, उपकार नको, हा आमचा न्याय्य हक्क आहे! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा म्हणून आज आपण केंद्राबरोबर लढतोय, मागणी करतोय. पण अभिजात दर्जा द्यायचा म्हणजे आम्हाला कोणाचे उपकार नकोत. आमचा हा न्याय्य हक्क आहे. तुम्ही जी काही परिमाणे लावली आहेत ती परिमाणे मराठी भाषा पूर्ण करीत आहे. मराठी भाषा ही कोणाचे लुटणारे नाही. मग जे हक्काचे आहे ते का म्हणून आम्ही सोडू. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा, असे ठणकावून सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक वेळेला मराठी माणसाला संघर्ष का करायला लागायला हवा, असा सवाल केंद्र सरकारला केला.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्य सरकारच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, हा दिवस वर्षातून एकदा येत असला तरी ज्या भाषेतून आपण बोलतो, जी आपली मातृभाषा आहे तिचा गौरव दिन रोज साजरा व्हायला हवा. रोज त्या भाषेचा गौरव वाढेल कसा असे काही तरी आपल्याकडून घडायला हवे. इतर राज्यांना त्यांचे भाषावर प्रांत, त्यांच्या राजधान्या सहज मिळाल्या, मग मराठीच्या बाबतीत दुजाभाव का? मुंबई मराठी माणसाला मिळाली नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागला.

घरात मराठी बोलायलाच हवे

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे, पण यापुढे किती वर्षे होणार? हा प्रश्न अपाल्याला पडू द्यायचा नसेल तर घरात मराठी बोलणे सुरू करायला हवे. माझ्या दोन्ही मुलांनी इंग्रजी शाळेत शिक्षण पूर्ण केले. पण शाळेच्या पहिल्या दिवशी शिवसेनाप्रमुखांनी बोलावून सांगितले, तुमची मुले इंग्रजी शिकली पाहिजेत, उत्तम इंग्रजी आलीच पाहिजे. पण घरात त्यांच्याशी मराठीतच बोलले पाहिजे. आज माझी दोन्ही मुले इंग्रजी बोलतात, हिंदी बोलतात, आपली मातृभाषा आपल्यासारखीच बोलतात याचा मला अभिमान आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठी भाषा दिन भव्य मैदानात व्हावा

पुढच्या वर्षीचा मराठी भाषा दिन हा बंद हॉलमध्ये नको, तर भव्य मैदानात व्हायला हवा. पूर्ण राज्याचा तो गौरव दिन असायला हवा. मातृभाषेचा गौरव दिन कसा करावा, तर महाराष्ट्र जसा करतो तसा करावा हे पूर्ण देशाने म्हटले पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

मराठी भाषा भवनाच्या कामाचा शुभारंभ गुढीपाडव्यापासून

आजच्या दिवशी मराठीला तो दर्जा मिळाला असता तर नक्कीच आनंद झाला असता. तरी 6 तारखेला पंतप्रधान पुण्यात काही उद्घाटनासाठी येत आहेत. तिथे त्यांनी घोषणा केली तरी चालेल, असे सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषा भवन 100 कोटी खर्चून उभारतोय. 2 एप्रिलला त्या कामाचा शुभारंभ होईल, अशी घोषणा केली.

शासकीय कागदपत्रांत लवकरच सोपी मराठी भाषा – सुभाष देसाई

पुस्तकांचे गाव ही संकल्पना 6 गावांत सुरू करणार, राज्य शासनाच्या भाषेत जी मराठी भाषा वापरली जाते ती लवकरच सुलभ मराठी भाषा शासनात वापरली जाणार, अशी ग्वाही भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली.

दुकानांवर नुसत्या मराठी पाटय़ा नकोत, तर दुकानदार, उद्योगांत मराठी माणूस हवा

सरकारी पातळीवर काही निर्णय घेत आहोत. मराठी भाषा भवन दिमाखात महाराष्ट्राच्या राजधानीत उभे राहणार म्हणजे राहणारच. त्याची सुरुवात गुढीपाढव्याला करणार आहोत. ही अभिमानाची गोष्ट आहे. मराठी पाटय़ा आपल्याला हव्यातच. कारण जे मुंबईतून सर्व काही मिळवताहेत, पिळताहेत, पण त्यांच्यात मराठीचा द्वेष आहे. दुकानांवर, आस्थापनांवर मराठी पाटय़ा असल्याच पाहिजेत, पण शिवसेनाप्रमुखांनी जे सांगितले की नोकऱया मागणारे होऊ नका, नोकऱया देणारे व्हा. मराठी माणूस नोकऱया मागत फिरतोय. हे चित्र बदलायला हवे. दुकानांवर मराठी पाटय़ा लावून चालणार नाही तर दुकानदार किंवा आणखी काही उद्योगधंदे आहेत त्यात मराठी माणसाने शिरले पाहिजे. जेव्हा कमी दाबाचा पट्टा तयार होतो तेव्हा बाहेरून चक्रीवादळ येते. मग आपण आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली तर असे चक्रीवादळ येणार नाही, असा कानमंत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला यावेळी दिला.

मराठी भाषा गौरवदिनानिमित्त राज्य सरकारच्या वतीने रविवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात शानदार कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत आदी उपस्थित होते.

कितीही दबाव आणा, झुकणार नाही… 2024 मध्ये दिल्लीत बसणारच! आदित्य ठाकरे यांचा ठाम विश्वास
छत्रपती शिवरायांच्या काळातही दिल्लीला झुकवणारी आपली मराठी भाषा आहे. त्यामुळे कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी आजदेखील ती दिल्लीसमोर झुकणार नाही. 2024 मध्ये आपण दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारच, असा जबरदस्त विश्वास पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.