महिला संघाचा प्रशिक्षक तुम्हीच निवडा! प्रशासकीय समितीची क्रिकेट सल्लागार समितीला विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

वेस्ट इंडिजमध्ये पार पडलेल्या महिला टी-20 क्रिकेट विश्वचषकात हिंदुस्थानी महिला संघाला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून मोठा पराभव पत्करावा लागला होता. यानंतर संघातली अनुभवी खेळाडू व माजी कर्णधार मिताली राज व प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातला वाद समोर आला होता. मितालीला उपांत्य फेरीसाठी संघातून वगळण्याच्या निर्णयावर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं होतं. या वादानंतर बीसीसीआय आणि क्रिकेट प्रशासकीय समितीने महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. मात्र प्रशासकीय समितीने (सीओए) सावध पवित्रा घेत सचिन-सौरभ आणि लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीलाच महिला टीम इंडियाचा प्रशिक्षक निवडण्याची विनंती केली आहे.

सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीला हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक निवडीचे अधिकार देण्यात आले आहेत. 2016 मध्ये अनिल कुंबळे आणि त्यानंतर रवी शास्त्रींची नेमणुकही याच समितीने केली होती. त्यामुळे मिताली राज-रमेश पोवार वादानंतर बीसीसीआय आणि प्रशासकीय समितीने सावध पवित्रा घेत अनुभवी खेळाडूंवर ही जबाबदारी टाकण्याचं ठरवलेलं दिसतंय.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, टॉम मूडी, वेंकटेश प्रसाद आणि डेव्ह व्हॉटमोर यांची नावे महिला टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.