कॉक्रोच पार्टीचे अभिजित दीपके हिंदुस्थानात येणार; जंतरमंतरवर आंदोलन करणार, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियातील आंदोलनातून उभ्या राहिलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके हिंदुस्थानात परतणार आहेत. नीट, एसएससी, सीबीएसई आणि सीयूईटी परीक्षेत झालेल्या गोंधळाच्या विरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे.

सध्या अमेरिकेत असलेल्या दीपके यांनी ‘एक्स’वर व्हिडिओ पोस्ट करून मायदेशी परतत असल्याची माहिती दिली. त्यानुसार 6 जूनला ते हिंदुस्थानात येणार आहेत. दिल्लीत उतरल्यानंतर संसद मार्ग पोलीस ठाण्यात आंदोलनाची परवानगी घेण्यासाठी जाणार आहेत. आंदोलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी विमानतळावर येऊन मला भेटावे, असे आवाहन त्यांनी केले. ‘‘पेपर फुटीच्या विरोधात आम्ही गेल्या काही दिवसांपासून आवाज उठवत आहोत. नीटसह वेगवेगळ्या परीक्षांमधील घोळाला धर्मेंद्र प्रधान हेच यासाठी जबाबदार आहेत. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायलाच हवा,’’ असे दीपके म्हणाले.

ऑनलाईन याचिकेवर 8 लाख सह्या

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी दीपके यांनी पक्षाच्या वेबसाईटवर ऑनलाईन याचिका अपलोड केली आहे. ‘‘आमच्या याचिकेवर आतापर्यंत 8 लाख लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत,’’ अशी माहिती त्यांनी दिली.

अशी बनली कॉक्रोच जनता पार्टी

देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी देशातील तरुणांची तुलना झुरळांशी केली होती. त्यानंतर अभिजित दीपके यांनी ट्विट करत ‘सगळी झुरळे एकत्र आली तर काय होईल,’ असा खोचक प्रश्न उपस्थित केला. त्यांचे हे ट्विट बघता-बघता व्हायरल झाले. त्यातूनच ‘कॉक्रोच जनता पार्टी’ स्थापन झाली.