
येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व त्याअंतर्गत असलेली व्यावसायिक आणि पारंपरिक अभ्यासक्रमाची डिग्री कॉलेजे सुरू होणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याविषयीची घोषणा केली. कोरोना प्रतिबंधक दोन्ही लसी घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये उपस्थित राहता येणार असून इतर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
ज्या विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेले नाही त्यांच्यासाठी विद्यापीठ आणि कॉलेजनी आपल्या संकुलात स्थानिक प्रशासनाच्या मदतीने लसीकरण मोहीम राबवायची आहे. तसेच 50 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थितीने कॉलेज सुरू करायची असल्यास स्थानिक कोरोना स्थितीचा अंदाज घेऊन प्रशासनाच्या मदतीने निर्णय घेण्याच्या सूचना सामंत यांनी दिल्या आहेत.
राज्याचे उच्च शिक्षण संचालक, तंत्र शिक्षण संचालक कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यातील वसतिगृहे टप्प्याटप्प्याने सुरू करण्याविषयी निर्णय घेतील. शिक्षक–शिक्षकेतर कर्मचाऱयांचे 100 टक्के लसीकरण करून त्याचा अहवाल दर आठवडय़ाला सरकारकडे सादर होणे आवश्यक आहे.































































